अर्थ, बांधकामवर प्रस्थापितांना  नकोत भविष्यातील प्रतिस्पर्धी 

मधुकर कांबळे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

अडथळ्यांची शर्यत पार करत कोण अर्थ व बांधकाम समिती सभापती होईल, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच गाजली. यानंतर आता कोण कोणाच्या बाजूने हे विषय समिती सभापतींच्या निवडीच्या वेळी स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम सभापतिपद महत्त्वाचे मानले जाते; मात्र या सभापतिपदावर विद्यमान प्रस्थापित नेत्यांना आपल्या भविष्यातील विरोधकाला हे सभापतिपद नको असे वाटत असल्याने अशी अडथळ्यांची शर्यत पार करत कोण अर्थ व बांधकाम समिती सभापती होईल, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या सभापतिपदासाठी किशोर बलांडे, अविनाश गलांडे, श्रीराम महाजन यांची नावे चर्चेत असली तरी आणखी नावेही ऐनवेळी पुढे येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

चार विषय समिती सभापतिपदांसाठी मंगळवारी (ता. 14) निवडणूक होणार आहे. भाजपसह कॉंग्रेसमधील डॉ. कल्याण काळे गट आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार समर्थक गटाने एकजूट कायम ठेवल्याचे दिसून आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांच्या बैठकीत चार दिवसांपूर्वीच सर्वांनी मिळून काम करा, असे निर्देश दिले आहेत.

क्‍लिक करा : रुग्ण दगावला..घाटीत नातेवाईकांची तोडफोड 

अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर सत्तार यांनी आपली बाजू मातोश्रीवर जाऊन मांडली आहे. ठाकरेंकडून सत्तार यांना क्‍लीन चिट दिल्याचे तूर्तास तरी दिसून येत आहे; परंतु बदललेल्या घडामोडींमुळे शिवसेनेतील फुटीर गट, कॉंग्रेसमधील सत्तारांसोबत असलेल्या सदस्यांच्या गटात खळबळ उडाली आहे. कॉंग्रेसचा अध्यक्ष नको, शिवसेनेचाच असावा, यासाठी सत्तार यांनी खेळी खेळली होती, अशी भूमिका पटवून दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मातोश्रीवर झालेल्या चर्चेनंतर पक्षप्रमुखांनी हे प्रकरण थंड बस्त्यात टाकल्याचे समजते. 

बांधकाम सभापतिपदासाठी डॉ. काळे यांना एकेकाळचे त्यांचेच समर्थक राहिलेले किशोर बलांडे नको आहेत तर श्री. सत्तार यांना त्यांच्या तालुक्‍यातील श्रीराम महाजन नकोत. या दोन्ही प्रस्थापित नेत्यांना आपापल्या तालुक्‍यात भविष्यातील विरोधक नको, यामुळेच बांधकाम सभापतिपदाच्या वेळीही काय होईल हे सांगणे अनिश्‍चित बनले आहे. 

बापरे ! : त्याने केला तसला व्हिडिओ व्हायरल, आता जेलमध्ये जावे लागणार 

तिसरेच नाव पुढे येण्याची शक्‍यता 

महाविकास आघाडीतील या स्थानिक वरिष्ठ नेत्यांचे अर्थ व बांधकाम समिती सभापतिपदासाठी नावावर एकमत होत नसेल तर ज्यांच्या नावावर एकमत होईल असे तिसरेही नाव ऐनवेळी पुढे येण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. 

हेही वाचा : घरात इलेक्‍ट्रिशियन कामाला आला रॅक सरकवले मग वाचा झाले काय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad z.p. speaker elecion