CoronaVirus : कोरोना योद्ध्यांसाठी धावला ‘कोरोना वॉरियर रोव्हर’ 

अनिलकुमार जमधडे
Wednesday, 20 May 2020

तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी बनवला स्वयंचलित रोव्हर 

औरंगाबाद : कोरोनाच्या संसर्गापासून डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी ‘कोरोना वॉरियर रोव्हर’ सज्ज झाला आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात न येताही रुग्णसेवा करण्यासाठी उपयुक्त असलेला हा ‘कोरोना वॉरियर रोव्हर’ घाटी रुग्णालयाला भेट देण्यात आला आहे. इको नीड्स फाउंडेशन व शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोव्हर साकारला आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व बाधित रुग्णांचा उपचार करीत असताना वारंवार त्यांच्या संपर्कात येऊन डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचारीसुद्धा कोरोनाग्रस्त होत आहेत. डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी यांचा रुग्णांशी होणारा थेट संपर्क स्वयंचलित यंत्र व रोबोट बनवायला पाहिजे अशी संकल्पना डॉ. प्रियानंद आगळे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   

१० हजार रुपयांमध्ये रोव्हर

त्याला शासकीय तंत्रनिकेतनचे विद्यार्थी अभिजित बेळीकर, सोनू मोरे; तसेच जालना येथील डॉ. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम कुंडलवाल यांनी तातडीने प्रतिसाद दिला. त्यांनी अगोदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सरोज जाधव यांच्याशी चर्चा करून गरज जाणून घेतली. त्यांना एल. जी. बालाकृष्ण कंपनीचे प्लॅंट हेड प्रशांत कान्हेरे यांनी साधनसामग्री उपलब्ध करून दिली. त्यानंतर १० दिवसांच्या अथक परिश्रमातून केवळ १० हजार रुपयांमध्ये सदरील रोव्हर बनविणे शक्य झाले आहे. 

हेही वाचा : पद्धतशीर दृष्टीकोन ठेऊन लाॅकडाऊन उठवु शकतो - उद्योजक सुनील किर्दक 

सुलभ मोबाईल ॲप

रोव्हरचे संचलन करण्यासाठी विशेष व सुलभ मोबाईल ॲप विकसित करण्यात आला आहे. सदरील ॲपच्या साहाय्याने कुठूनही हा रोव्हर नियंत्रित व संचलित करता येतो. हा रोव्हर स्वयंचलित पद्धतीने रुग्णाला औषधी, जेवण व आवश्‍यक साहित्य पुरवू शकणार असल्याने डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचा थेट संपर्क येणार नाही, त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी मदत होणार आहे.

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

रोव्हर अधिष्ठाता यांच्याकडे सुपूर्द 

रोव्हर बनवण्यासाठी प्राचार्य एफ. ए. खान यांनी प्रोत्साहन दिले. नुकताच हा रोव्हर अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी डॉ. प्रियानंद आगळे, प्रशांत कान्हेरे, प्रशांत दंदे यांच्यासह डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. सरोज जाधव, डॉ. भारत शिरसाठ यांची उपस्थिती होती. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Automated rover made by students of Tantraniketan