कोरोनावर मात करण्यासाठी औरंगाबादेत महापालिकेचा काढा... 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

औरंगाबाद शहरातील बाधितांची संख्या लक्षात घेऊन महापालिकेने देखील रुग्णांना काढा देण्याचा निर्णय घेतला. मात्र शोधून-शोधून फक्त २० किलो काढा महापालिकेला मिळाला.

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढा उपयुक्त ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील बाधितांची संख्या लक्षात घेऊन महापालिकेने देखील रुग्णांना काढा देण्याचा निर्णय घेतला. मात्र शोधून-शोधून फक्त २० किलो काढा महापालिकेला मिळाला. तो दोन ते तीन दिवसात संपला. आता नव्याने पुरवठादार व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. 

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. लस किंवा औषधी उपलब्ध झाल्याशिवाय कोरोनावर मात करणे शक्य नसल्यामुळे जगभरात संशोधन सुरू आहे. त्यात योग गुरु रामदेव बाबा यांनी औषधी बाजारात आणून आयुर्वेदावर पण चर्चा घडवून आणली. त्यापूर्वीच आयुष्य मंत्रालयाने देखील रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काढा उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार महापालिकेने रुग्णांना काढा देण्याचा निर्णय घेतला. पण काढ्यासाठी आवश्‍यक तुळशी पाने, लवंग, सुंठ, दालचिनी, काळी मिरी उपलब्ध करून ती वाटून आणायची कुठून असा प्रश्‍न पडला.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले

दरम्यान बीड येथील डॉ. चरखा यांनी महापालिकेला २० किलो काढा देण्याची तयारी दर्शविली. सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या पाहता हा काढा फक्त दोन ते तीन दिवसच पुरला. डॉ. चरखा यांची पुरवठ्याची तयारी असली तरी बीड येथे जाऊन काढा आणण्यासाठी हेलपाटा मारावा लागणार आहे. त्यामुळे शहर परिसरात कुणाकडे काढा मिळतो का? याचा शोध प्रशासनातर्फे घेतला जात आहे. 

तयारीसाठी मोठी कसरत 
दिवसातून दोनवेळा काढा देण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र काढा तयार करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. जेवढा काढा तयार करायचा आहे, त्यापेक्षा दुप्पट पाणी गॅसवर ठेऊन ते अर्धे होईपर्यंत उकळावे लागते. क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना जेवण देताना महापालिका प्रशासनाची धावपळ होत आहे. त्यात काढ्याचा ताण वाढला आहे. 

मालेगावात घटली रुग्णसंख्या 
मालेगावमध्य कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. मात्र युनानी काढ्यामुळे रुग्णसंख्या कमी झाल्याचा दावा केला जात आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayurvedic medicine is useful for boosting immunity