बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडे तोडणार नाही : उद्धव ठाकरे

माधव इतबारे
Friday, 10 January 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे स्मारक उभारताना एकही झाड तोडणार नाही, उलट जांभूळ व इतर उपयोगी झाडे कुठे आणि कशी लावता येतील याचा मी विचार करतोय असे सांगत झाड तोडणार नसल्याचा पुनरुच्चार केला. 

औरंगाबाद-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारताना एकही झाड तोडले जाणार नाही, तर पक्षी बसतील असे झाले असे झाडे लावू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. दहा) दिले. 

एमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानातील प्रस्तावित बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी उद्धव ठाकरे यांनी केली यावेळी ते बोलत होते.

स्मारकासाठी झाडे तोडू नका, असे आवाहन पर्यावरण प्रेमींकडून यावेळी ठाकरे यांना करण्यात आले. त्यावर श्री. ठाकरे म्हणाले, स्मारक झाल्यावर तुम्ही मला सांगा. इथे झाडे तोडली नाही तर लावलेली दिसतील. याठिकाणी निलगिरी, सुबाभूळ अशी झाडे आहेत. त्यावर पक्षी बसत नाहीत. त्यामुळे पक्षी येतील अशी जांभूळ, चाफा अशी झाडे लावण्यात येतील. 

अशी आहे पार्श्‍वभूमी 

मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतील मेट्रो कारशेडला स्थगिती देत आरे कॉलनीतील एकही झाड यापुढे तोडू देणार नाही असा पवित्रा मुख्यमंत्री ठाकरे घेतला होता. त्यानंतर औरंगाबाद येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शेकडो झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील ट्‌विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

हेही वाचा-

इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 

पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या... 

या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos

तसेच गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी देखील बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडे न तोडता ते उभारण्याची जबाबदारी एमजीएम संस्थेवर सोपवावी, अशी भूमिका मांडली होती.

या पार्श्वभूमीवर आजच्या पाहणी वेळी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे स्मारक उभारताना एकही झाड तोडणार नाही, उलट जांभूळ व इतर उपयोगी झाडे कुठे आणि कशी लावता येतील याचा मी विचार करतोय असे सांगत झाड तोडणार नसल्याचा पुनरुच्चार केला. 

बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाप्रमाणे स्मारक 

येथील स्मारक बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच दमदार असले पाहिजे, अशा सूचना त्यांनी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला दिल्या. पालकमंत्री सुभाष देसाई, प्रधान सचिव अजय मेहता, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thackeray Memorial News Uddhav Thackeray Aurangabad News