'बामु' विद्यापिठाचा एम.फिल. अभ्यासक्रम सुरूच राहणार

bamu.jpg
bamu.jpg

औरंगाबाद : एम.फिल., पीएच.डी. संशोधनासाठी राज्यात सर्वाधिक विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आहेत. विद्यार्थ्यांची मागणी व फेलोशिपचे प्रमाण पाहता चालू शैक्षणिक वर्षात एम. फिल. अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू ठेवण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. 

विद्यापीठातील विभागप्रमुखांची कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. बैठकीत व्यापक चर्चा होऊन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात एम.फिल. अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाच्या नवीन धोरणात या अभ्यासक्रमाचा समावेश नाही. तथापि, हे धोरण २०२२ पासून लागू होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता सदर अभ्यासक्रम सुरू ठेवण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांची संख्या यावर संबंधित विभागातील विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. 

विद्यापीठात सध्या १८ विभागात अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, गणित व वाणिज्यशास्त्र या दहा विभागांत अनुदानित अभ्यासक्रम आहेत. तर पाली - बुद्धिझम, उर्दू, ग्रंथालयशास्त्र, संगणकशास्त्र, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, वृत्तपत्रविद्या व जनसंवाद या विभागांतील अभ्यासक्रम हे विनाअनुदान तत्त्वावर चालवले जात आहेत. 

एक नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी 
एम. फिल. अभ्यासक्रमांचे प्रवेश हे सीईटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. यासाठी १ ते १० नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येईल. २० नोव्हेंबरला ऑनलाइन सीईटी घेण्यात येईल. त्याचा २१ तारखेला निकाल जाहीर होईल. पुढील दहा दिवसांत प्रवेश प्रक्रिया राबवून एक डिसेंबरपासून तासिकांना सुरुवात होणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राची परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी सीईटीला बसण्यासाठी पात्र आहेत, अशी माहिती पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com