रातोरात स्टार झालेल्या भाजीवाल्या राहुलची कहाणी, बेरोजगार झाला; पण खचला नाही

Biography of vegetable seller Rahul Labade
Biography of vegetable seller Rahul Labade

औरंगाबाद : ‘जे विकत घेऊ शकत असतील त्यांनी विकत घ्या, जे अडचणीत असतील त्यांनी मोफत घ्या, मोफत घ्या’, औरंगाबादच्या भीमनगर भावसिंगपुरा भागातील राहुल लबडे या भाजीवाल्या तरुणाचा सोशल मेसेज समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. यानिमित्त स्वत: फेसबुकवर सध्या अॅक्टीव्ह नसणारा या भावाला तरुणाईने मात्र डोक्यावर घेतले आहे. आज व्हॉट्सअॅप, हॅलो, इंस्टाग्रॅम, फेसबूक या सोशल मीडियावर राहुलचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. 

लॉकडाउनच्या काळात गोरगरीब, कष्टकऱ्यांचे जगणे हराम करणारे अनेक प्रसंग आजूबाजूला व जगभरही मन विषण्ण करून टाकताहेत. या भयाण, भणंग परिस्थितीतही अनेक माणसे आपल्या हातून घडेल तशी समाजसेवा करताहेत. सगळीकडे माणुसकीच आभाळ फाटलेले असताना राहुल सारखी माणसं ते आभाळ सावरण्याचे चिमुकले का होईना पण मनाला उभारी देण्याचे कार्य करताहेत.
 
पहिल्यांदा कुणी केला फोटो अपलोड? 
या मोठ्या मनाच्या छोट्या भाजीवाल्याविषयी त्याचा मित्र अजित खरात आणि मनीष आवटे यांनीच पहिल्यांदा त्यांच्या फेसबुक वॉलवर लिहिले. या बाबत खरात म्हणाला, ‘‘लॉकडाउनमुळे कामे बंद असल्याने अनेकांनी नवीन व्यवसाय सुरू केले आहेत. या महामारीची झळ मजूर, कामगार व खासगी नोकरदारांना मोठ्या प्रमाणात पोचत आहे. कौटुंबिक जबाबदारी असल्याने उदरनिर्वाह करण्यासाठी माझा मित्र राहुल लबडे याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय चालू केला. राहुलचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले असून, तो लॉकडाउनपूर्वी एका कंपनीत सेल्स व मार्केटिंगचा जॉब करत होता.

अशातच लॉकडाऊन जाहीर झाले आणि काम बंद झाले. परंतु, परिस्थितीसमोर हतबल न होता राहुलने न लाजता भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. खूपच कौतुकास्पद आहे हे. मला राहुलच्या या नवीन व्यवसायाबद्दल काही कल्पना नव्हती. मी आंबेडकर चौकामध्ये खरेदीनिमित्त गेलो असता मित्र राहुल लबडेची भाजीची गाडी दिसली आणि मी त्याच्या गाडीकडे आकर्षित झालो. त्याला कारणही तसेच ‘एकमेका साह्य करू! अवघे धरू सुपंथ’ हे संत तुकाराम महाराजांचे सुंदर वचन व त्याखाली ‘जे विकत घेऊ शकतील त्यांनी विकत घ्या, जे अडचणीत असतील त्यांनी मोफत घ्या’ असे लिहिलेला बोर्ड त्यांनी लावलेला होता. त्याबद्दल मी त्याला विचारणा केली, ‘हे काय आहे राहुल?’ यावर तो उत्तरला अरे संदीप गरजूंना आपणाकडून जे-जे शक्य होईल ती-ती मदत आपण केली पाहिजे. खरच मला आज राहुलचा उदारपणा पाहून खूप बरं वाटलं. त्याच्या नवीन व्यवसायाला प्रोत्साहन व तो करत असलेल्या सामाजिक कार्याला हातभार म्हणून थोडीशी खरेदी त्याच्याकडून केली.
 
घरची परिस्थिती बेताचीच, एका आजीबाईमुळे मन द्रवले
या साऱ्यानिमित्त थेट राहुलशी बोलणे झाले, ‘‘तो म्हणाला, की सर माझ्या घरची परिस्थितीही तशी बेताचीच आहे. वडील भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. त्यावरच आमची गुजराण सुरू आहे. मलाही काम न उरल्याने वडिलांनी मदत करू लागलो. एका आजीला भाजी घेण्यासाठी पन्नास रुपयेही नसल्याने तिने मला ती उधार मागितली व पैसे नंतर देईन अशी म्हणाली. मी तिला ती दिली. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवत पाच रुपये दिले व आशीर्वाद दिले. तिने तिच्या पन्नास रुपये कमाईची गोष्ट सांगितली. तिच्या कामाचा पन्नास रुपयांचा मोबदला मिळवायला आजीला दूरवर चालत जाऊन मिळवावा लागणार आहे, हे जेव्हा मला समजले, तेव्हा मला तिला भाजी मोफत द्यावी, असे वाटले. त्या छोट्या घटनेतून मला हा बोर्ड लिहियचे सुचले.

मग वडिलांना सांगून जे घेतील त्यांना विकत व ज्यांची ऐपत नाही त्यांना मोफत, असा मी निर्णय घेऊन टाकला. आता अनेक लोक माझ्या या बोर्डाकडे बघत भाजीपाला विकत घेत आहेत. तर काही जण मोफत. मला या कामाचे समाधान वाटते. संत तुकारामांचा ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या ओळीही माझी प्रेरणा ठरल्या. राहुलच्या या छोट्या कृतीचे प्रसिद्ध पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे आदींसारख्या सेलिब्रिटींनीही कौतुक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com