CoronaVirus : धक्कादायक : स्टील इंडस्ट्रीजची वेठबिगारी माणुसकीला लाजवणारी

photo
photo

औरंगाबाद : जालना येथील स्टील इंडस्ट्रीज मध्ये काम करणाऱ्या कामगारांची वेठबिगारी माणुसकीलाही लाजवणारी आहे. येथील कामगारांना लोखंडाच्या भट्टीपुढे दिवसभर घाम गाळुन अक्षरश: रक्त आटवावे लागते. विशेष म्हणजे कामगाराला जे वेतन मिळते तेवढाच वाटा काम न करता ठेकेदाराला मिळतो. त्यामुळे कारखानदार आणि ठेकेदार गब्बर होत असताना कामगारांच्या अनेक पिढ्या बरबाद होत आहेत.  छोट्याश्या खोलीत आठ ते दहा मजुर झोपतात. झोपेतुन उठल्यानंतर कंपनीत जाणे, आणि कंपनीतुन आल्यावर झोपी जाणे असा हा दिनक्रम आहे.

देशभरात स्टील इंडस्ट्रीज म्हणून जगात ओळख असलेल्या जालना येथील औद्योगिक वसाहतीत असंघटित कामगारांच्या समस्यांचा मात्र अक्षरश: डोंगर उभा आहे. जालना जिल्ह्याची १ मे १९८२ रोजी निर्मिती झाली. त्यावेळी अनेक मोठ्या कंपन्या सुरु झाल्या होत्या. बियाणांची पंढरी त्यातच काही स्टील कारखाने सुरू झाल्याने जालना औद्योगिक वसाहतीला भरभराट निर्माण झाली होती. नव्वदच्या दशकात जोशात असलेल्या कामगार चळवळीने कामगारांना संघटित केले. मात्र त्यातुनच पुढे संघर्ष निर्माण होत गेले. त्यातुनच कारखानदारांनी कधी कामगार कपात, कधी टाळेबंदी करून कामगारांना जेरीस आणले. जुन्या कामगारांना कामावरून काढून टाकण्याचे प्रकार सुरु झाले. त्यातुन जुन्या व नवीन कामगारांचा हा संघर्ष पेटत गेला. कामगारात हाणामारी, दगडफेक आदी प्रकार घडले. यातुन अनेक गुन्हे दाखल झाले. या संघर्षातुन औद्योगीक वसाहतीचे मोठे नुकसान झाले. पुढे मात्र स्टील कारखानदार मंडळींनी स्थानिक कामगारांना डावलून या स्टील उद्योगासाठी ठेकेदाराच्या माध्यमातून परप्रांतीय मजूर आणण्यास सुरवात केली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मजुरांचे शोषण

कामगार चळवळी मोडीत निघाल्याने स्टील कारखान्यातील परप्रांतीय मजूरांचे कारखानदार आणि ठेकेदार मंडळी शोषण करीत आहेत. कामगारांचा आवाज‌ दाबला जात आहे. याकडे कारखानदार, ठेकेदार, सरकारी यंत्रणा, पुढारी लक्ष देत नसल्याची ओरड होत आहे. जालना येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांची परवड बघवत नाही अशी स्थिती आहे. 
परप्रांतील मजुरांना येथे साधारण ३०० ते ६०० रुपयांच्या दरम्यान रोज दिला जातो. या मजुरांना प्रत्येक आठवड्याला दोन ते चार हजार रुपयांदरम्यान पगार मिळतो. धक्कादायक म्हणजे एका कामगाराला मिळणारा रोज, तेवढाच पैसा ठेकेदाराला काहीही काम न करता मिळतो. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कारखानदार बिनधास्त

कामगाराची सर्व जबाबदारी ही ठेकेदाराची असल्याने कारखानदार बिनधास्त असतो. कधी स्फोट झाला तर जखमी अथवा मृत कामगाराच्या कुटुंबीयांना पाच दहा लाखाची रक्कम दिली जाते. धक्कादायक म्हणजे त्यातही ठेकेदार अर्धा वाटा घेतो. मात्र सर्व प्रकरण मिटवण्याच्या जबाबदारीने कारखानदारही निर्धास्त असतो. परराज्यात गरीबीने पिचलेल्या कामगार कुटुंबीयाकडून विरोध होऊ शकत नाही, याची पुरेपुर खात्री ठेकेदार आणि कारखानदाराला असल्याने बिनबोभाट कामगारांची पिळवणुक सुरु आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

प्रशासनाचे झोपेचे सोंग

कारखान्यातील मजूरांचे शोषण ही बाब कामगार अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि राजकीय मंडळी या सर्वांना माहित आहे. कामगारांचा आवाज खुलेआम दाबला जात आहे. कारखान्यात रक्ताचे पाणी करणाऱ्या या मजुरांची परवड बघवत नाही. मात्र कुटुंबाच्या दोन वेळच्या रोजीरोटीसाठी मजुरांना हे सर्व निमुटपणे सहन करावे लागत आहे. 
  

स्टील कंपनी तीन शिफ्ट मध्ये सुरु असते. कामाचे आठ तास असले तरीही बारा तास काम करावे लागते. एका आठ बाय दहाच्या खोलीत आठ ते दहा मजुर भाड्याने राहतात. चंदनझिरा भागात अशाच पद्धतीच्या खोल्यांची रचना आहे. काम आणि झोप एवढाच दिनक्रम कामगारांचा असतो. अत्यंत विदारक परिस्थीतीत हे मजुर काम करत असतात.  
गणेश राऊत 
नगरसेवक तथा गटनेता (कॉंग्रेस) जालना नगर परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com