गाय चारण्यावरुन भांडण, जमावाच्या मारहाणीत महाराज गंभीर जखमी; औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

परमेश्‍वर कोकाटे
Saturday, 26 December 2020

जाभंळी तांडा (ता.पैठण) येथील रामटेकडीवरील राम मंदिरातील महाराज व अज्ञात लोकांच्या जमावात गाय चारण्यावरुन भांडण झाले. यात जमावाच्या मारहाणीत महाराज गंभीर जखमी झाले आहेत.

चितेगाव (जि.औरंगाबाद) : जाभंळी तांडा (ता.पैठण) येथील रामटेकडीवरील राम मंदिरातील महाराज व अज्ञात लोकांच्या जमावात गाय चारण्यावरुन भांडण झाले. यात जमावाच्या मारहाणीत महाराज गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (ता.२५) दुपारी बारावाजेच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चितेगावपासुन पूर्वेस आठ ते दहा किलोमीटरवर जाभंळी तांडा असून डोंगर पायथ्याशी एक रामटेकडी आहे.

 

 

या टेकडीवर रामाचे जुने मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. दोन वर्षांपासून येथे गणेश महाराज वास्तव्यास आहेत. शुक्रवार दुपारी बारा वाजेच्या सुमारास अज्ञात लोकांचा जमाव व महाराज यांच्यात गाई चारण्यावरुन भांडण सुरु झाले. काठ्या व दगड घेऊन महाराजांना मारहाण केली. महाराज जंगलात पळत आहेत व हातात दोन तलवारी घेऊन ते भांडत असल्याची चित्रफित सोशलमीडियावर व्हायरल झाली आहे.

 

 

 
 

या हल्ल्यात गणेश महाराज जखमी आहेत. औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या व्हिडिओमध्ये महाराज अज्ञात जमावासमोर हातात दोन तलवार घेऊन मला पालघरसारखे मारायला आले आहात का ? असे म्हणत आहे. त्यामुळे या घटनेचा गुत्ता वाढत चालला आहे. गाई चारण्याचेच कारण आहे कि आणखी काही कारण आहे. तसेच महाराजांकडे तलवारी कुठून आल्या? या बाबी चौकशीनंतर समोर येईलच.

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priest Serious Injured In People Attack Aurangabad News