धक्कादायक : सख्ख्या वहिनीसोबतच त्याचे प्रेमसंबंध, मग केले असे....

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

- सख्ख्या भावाचा खून
- आरोपीस अटक 
- पैठणच्या रिक्षाचालकाच्या खुनाचे रहस्य उलगडले 

पैठण (जि. औरंगाबाद) : भावजयीशी असलेल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून केल्याची कबुली गोरख विठ्ठल लोखंडे (वय ३६, सध्या रा. राहता, जि. नगर) या संशयित आरोपीने पोलिस तपासात दिली. 

येथील पाचपिंपळ गल्लीतील दुमजली इमारतीत कुलूपबंद खोलीत शिवाजी विठ्ठल लोखंडे (वय ४०) या रिक्षाचालकाचा तीक्ष्ण हत्याराने खून झाला. ही घटना रविवारी (ता.१९) उघडकीस आली. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पैठणचे पोलिस उपअधीक्षक गोरक्ष भामरे, पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या संयुक्त पथकाने चोवीस तासांत खुनाचा तपास केला. गोरख लोखंडे राहत असलेल्या राहता येथे खून झालेल्या शिवाजीची पत्नी आठ दिवस राहिली. त्यानंतर ती तिच्या माहेरी गेली. दरम्यान, शेतात पाणी भरायला जातो, असे सांगून गोरख हा घरातून गेला व पैठणला आला.

पोलिसांना गोरखचा संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली असता तो गडबडून गेला. भावजयीशी असलेल्या प्रेमसंबंधात अडथळा होत असल्यामुळे सख्ख्या भावाचा खून केल्याची कबुली गोरखने दिली. तपास
पथकात फौजदार भगतसिंग दुल्लत, गफ्फार पठाण, सुधाकर दौंड, झिया चाँद, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद खांडेभराड, संजय काळे, रतन वारे, पोलिस नाईक राहुल पगारे, संजय भोसले, योगेश तरमाळे, उमेश बकले, संजय तांदळे, पैठण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुदाम वारे, फौजदार संतोष माने, सचिन सानप, पोलिस कॉन्स्टेबल भगवान सिंगल, कर्तार सिंगल, श्री. बनगे, श्री. ढाकणे, श्री. मोरे यांचा समावेश होता. 

हो खरंच - धक्कादायक! ५०० पटींनी वाढले आंबटशौकीन, महाराष्ट्र मात्र सभ्य
 
हर्सूलमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी 

औरंगाबाद : पूर्ववैमनस्यातून हर्सूल परिसरातील अंबरहिल येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी (ता.१९) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती. या हाणामारीत दोन्ही गटांकडील मिळून चार ते पाच जण जखमी झाले आहेत. 
दोन्ही गटांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनंतर परस्परविरोधी गुन्हे हर्सूल पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. दीपक दणके, बाळा दणके, रवी दणके, अजय काकफळे, (सर्व रा. राजनगर, अंबरहिल, जटवाडा रोड) स्वप्नील मधुकर जाधव (रा. जयभवानीनगर), मोहन पुसे, राहुल पुसे, बाळू पुसे, गणेश पुसे, राधाबाई पुसे, (सर्व रा. राजनगर, अंबरहिल), संतोष लाला काकडे (२९, रा.डिंबरगल्ली, बेगमपुरा) असे मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत. 

 हेही वाचा - कोरोना बरा होतो; मग एड्सपेक्षा धोकादायक का?

 
मद्यपी कारचालकांविरुद्ध गुन्हा दाखल 

औरंगाबाद : मद्याच्या नशेत भरधाव कार चालविणाऱ्या सूरज मोतीलाल डोकवाल (२५, रा. नारळीबाग), किशोर मुरलीधर गाडेकर (२२, रा. समर्थनगर) यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल झाला. सूरज डोकवाल, किशोर गाडेकर या दोघांनी यथेच्छ मद्यपान करून दोघेही सोमवारी सायंकाळी कार (एमएच-१४, डीएन-३८४७) घेऊन फिरत होते. 

 
महिलेस शिवीगाळ करून मारहाण 

औरंगाबाद : छावणी परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय महिला अंघोळ करीत असतानाचा व्हिडिओ तयार करणाऱ्या जनार्दन बनकर (रा.छावणी परिसर) याने महिलेस शिवीगाळ करून मारहाण केली. तक्रारदार महिला १५ एप्रिल रोजी अंघोळ करीत असताना जनार्दन बनकर याने तिचा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार केला होता. पीडित महिलेच्या तक्रारीवरून जनार्दन बनकर याच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother killed brother At Paithan District Aurangabad