चिंचोलीत भाऊच बनला भावाचा वैरी, कुऱ्हाडीने खून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

 तीन संशयित आरोपींना घेतले ताब्यात 

आडूळ/चित्तेपिंपळगाव (जि. औरंगाबाद) : शेतीच्या वादातून भावकीत झालेल्या वादाचे तुंबळ हाणामारीत रूपांतर झाल्याने गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना चिंचोली (ता. औरंगाबाद) येथे शुक्रवारी (ता. पाच) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. कृष्णा रामराव वाघ (वय ३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा रामराव वाघ या शेतकऱ्याची चिंचोली (ता. औरंगाबाद) शिवारात गट क्रमांक २५ मध्ये शेती आहे. भावकीतीलच त्याचे सख्खे चुलतभाऊ असलेले उद्धव लक्ष्मण वाघ, अंकुश लक्ष्मण वाघ, चुलता लक्ष्मण वाघ यांची शेती शेजारीच आहे. कृष्णा वाघ, लक्ष्मण वाघ यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून शेतीचा वाद सुरू आहे. शुक्रवारी त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. लक्ष्मण वाघ, उद्धव वाघ, अंकुश वाघ यांनी कृष्णा वाघ याला कुऱ्हाड व दांड्याने जबर मारहाण केली.

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

यात तो गंभीररीत्या जखमी होऊन जागेवर कोसळला. यानंतर संशयित आरोपींनी कृष्णाला गंभीर अवस्थेत पाहून घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या कृष्णाला शेजारऱ्यापाजाऱ्यांनी उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पळून गेलेल्या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत शेतकऱ्याचा भाऊ बाबासाहेब वाघ यांनी रात्री चिकलठाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे, पोलिस नाईक सोपान डकले, दीपक सुराशे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 
 

वादळी वाऱ्याने घरावरील दगड अंगावर पडून मुलीचा मृत्यू 
 

फुलंब्री : मारसावळी (ता. फुलंब्री) येथे तीन जूनला वादळी वाऱ्यामुळे पत्राच्या घरावरील दगड पडून घरात आठ वर्षांची मुलगी जखमी झाली होती. उपचारादरम्यान गुरुवारी (ता.चार) रात्री या मुलीचा मृत्यू झाला. मीनाक्षी संजय जाधव (वय आठ) वर्षे मृत मुलीचे नाव आहे. 

मारसावळी येथे शेतवस्तीवरील गट क्रमांक १२५ मध्ये संजय जाधव आपल्या कुटुंबासह राहतात. प्रशासनाने तीन व चार जूनला चक्रीवादळ येण्याच्या शक्यतेमुळे कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या होत्या. जाधव कुटुंबीयाने घरातच थांबून सूचनांचे पालन केले. वादळी वाऱ्यामुळे मध्यरात्री दीडच्या सुमारास मीनाक्षीच्या अंगावर पत्रावरील दगड पडल्याने ती जखमी झाली. तिला उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी (ता.चार) रात्री या मुलीचा मृत्यू झाला. फुलंब्री पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जाधव कुटुंबाच्या पडझड झालेल्या घराची पाहणी सरपंच पुरुषोत्तम गाडेकर, ग्रामसेवक श्री. राठोड आदींनी केली. 
 

वादळामुळे अंगावर दगड पडून मीनाक्षी जाधव या मुलीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. शासन निर्णयाच्या अधीन राहून कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना तत्काळ चार लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल. 
- सुरेंद्र देशमुख, तहसीलदार फुलंब्री. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother's murder at chincholi dist Aurangabad