औरंगाबादकरांनो थर्टी फर्स्ट घरीच साजरा करा, दारु पिताना दिसल्यास होणार कारवाई

प्रकाश बनकर
Thursday, 31 December 2020

कोरोनामुळे यंदा थर्टी फर्स्ट घरीच साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यातच शहर, जिल्ह्यात ३१ जानेवारीपर्यत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

औरंगाबाद : कोरोनामुळे यंदा थर्टी फर्स्ट घरीच साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यातच शहर, जिल्ह्यात ३१ जानेवारीपर्यत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन हॉटेल, रेस्टॉरंटऐवजी आता घरीच करावे लागणार आहेत. या संचारबंदीमुळे हॉटेल, बार हे रात्री साडेदहा वाजता बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे अनेकांनी पार्सल घेऊन घरीच नवीन वर्ष साजरा करण्याचा निश्‍चय केला आहे. यात अनेक जण विनापरवानी दारू पिताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. अशा विनापरवानगी दारू पिणारे व अवैधरित्या दारू विक्री करणारे राज्य उत्पादन शुल्कच्या रडारवर आहेत.

 

 

 

थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहर परिसरातील ढाबे, हॉटेलचालक, बारची तपासणी होणार आहे. यासाठी विभागातर्फे विभागाचे एकूण ९ स्कॉड तयार करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हे पथके दारू पिणाऱ्यांचीही चौकशी करीत त्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे का? कोठुन दारू आणली, दारू विक्रेता परवानाधारक आहे का? तो विभागाने दिलेले सर्व नियमाचे पालन करतो का याची चौकशी करीत आहेत. यात आतापर्यंत जिल्ह्यात छोट्या कारवाया करण्यात आली आहेत. शहर व जिल्ह्यातील ढाब्यावर अवैधरित्या दारू विक्री करण्यात येत आहेत. अशा ढाबे चालकांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

 

 

 
 

राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांची ही संयुक्त करवाई अनेक ठिकाणी होत आहेत. यामुळे आता विनापरवाना दारू पिताना आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कळविण्यात आले आहेत. लॉकडाऊन काळात अनेकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे ऑनलाईन अर्ज करीत दारू पिण्याचा परवाना काढला आहेत. दरवर्षी थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर अनेक जण एक दिवसाचा दारू पिण्याचा परवाना काढत असतात. यंदा परवाना काढण्यासाठी अर्ज आले नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.

असे आहे पथके
-विभागाचे एकूण ९ पथके.
-पाच नियमित पथके
-चार विशेष पथकांचा समावेश असेल.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate Thirty First At Home, If Any Found Drinking Then Action Aurangabad News