VIDEO : बाबागाडी, लोटगाडीतून लेकरं चालली मध्यप्रदेशला, तेही औरंगाबादेतून

अतुल पाटील
Friday, 8 May 2020

कोरोना विषाणूमुळे देश दीड महिन्यापासून लॉकडाउन आहे. सगळीच कामे ठप्प असल्याने मजुरांची उपासमार होत आहे. हातचे पैसेही संपले म्हणूनच, त्यांना गावाची ओढ लागली आहे.

औरंगाबाद : तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचलेय. साहजिकच डांबरी रस्त्यावर मृगजळही दिसायला लागलेय. याही परिस्थितीत परप्रांतीय मजुरांना लागलेली घरची ओढ स्वस्थ बसून देत नाही. या सगळ्यात हाल होतेय ते लेकरांचे. खेळण्यातली बाबागाडी आणि बांधकामावरील लोटगाड्यावर बसून तेही गावी निघालेत. यांचाही पायी प्रवास औरंगाबाद ते मध्य प्रदेश होतोय. तोदेखील तब्बल पावणेपाचशे किलोमीटरचा. कुटुंब कबिल्यासह रेशन, कपड्याची ओझी वाहत मजुरांचा हा प्रवास रोखणार तरी कोण? असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

कोरोना विषाणूमुळे देश दीड महिन्यापासून लॉकडाउन आहे. सगळीच कामे ठप्प असल्याने मजुरांची उपासमार होत आहे. हातचे पैसेही संपले म्हणूनच, त्यांना गावाची ओढ लागली आहे.

ब्लॉग - अस्वस्थ वर्तमान

राज्य सरकारकडूनही परप्रांतीयांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळत आहे. मात्र, त्यासाठी आरोग्य तपासणी आवश्यक आहे. ‘‘जिल्हाधिकारी कार्यालयात आठवड्यापासून हेलपाटे घालत आहे. तिकडून गावाकडे पाठवले गेले.’’ असे एका मजुराने ‘सकाळ’ला सांगितले. 

आरोग्य तपासणीचे झंजट टाळण्यासाठी मजुरांनी पायीच जायचा निर्णय घेतला आहे. पैठण येथे बांधकामावर काम करणारे हे मजूर आहेत. तिथून गुरुवारी (ता. सात) त्यांच्या प्रवासाला सुरवात झाली आहे. यांचा १७ जणांचा ताफा असून, सहा-सात लहान मुले आहेत. औरंगाबादेतून ते मध्यप्रदेशातील हारदा जिल्‍ह्यात निघाले आहेत. मोहनपूर, रेडगावठाणा गावचे रहिवासी आहेत. रात्रीचा दिवस करत पायाला भिंगरी लावल्यासारखी त्यांची पावले झपाझप गावाच्या दिशेने पडत आहेत. 

संबंधित बातमी - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली
 
प्रवासासाठी विकले मोबाईल 
औरंगाबादहून हारदा आणि तिथून पुन्हा गावाकडे जावे लागणार आहे. दहा ते पंधरा दिवस लागू शकतात. त्यासाठी जवळ पैसे असावेत म्हणून तीनशे-चारशे रुपयाला मोबाईल विकल्याचे यांच्यातीलच योगेश यांनी सांगितले. 

राजकारण्यांचा अल्पप्रतिसाद 
शहरातून जात असलेल्या मजुरांची विदारकता शहरातील राजकारण्यांच्या कानावर टाकली; मात्र बहुतांश राजकारण्यांनी कानावर हात ठेवल्याचे चित्र होते. यात विधान परिषदेचे आमदार त्यास अपवाद ठरले. ते कुठे थांबल्यास त्यांना जेवण पोच करू, असे त्यांनी कळविले. 

हे चित्र पाहणारेही हेलावले 
शहरातील मुकुंदवाडी, सिडको, आंबेडकरनगर परिसरातून सिल्लोडकडे रवाना झाले; मात्र हे चित्र पाहणाऱ्या शहरवासीयांचे मन हेलावत होते. आंबेडकरनगर येथील नागरिक लहान लेकरांच्या हातात दहा-वीस रुपये ठेवण्यासाठी सरसावले होते. यात अनेकांनी पाणी, बिस्किटे, खाद्यपदार्थही दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Children Drove To Madhya Pradesh By Babagadi Lotgadi From Aurangabad