कुठे आहे कोरोनाचा वाढता धोका कायम ?

मधुकर कांबळे
Monday, 10 August 2020

ग्रामीणपैकी, औद्योगिक वसाहत असलेल्या वाळूज-बजाजनगरसह वैजापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, औरंगाबाद या तालुक्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.  

औरंगाबाद ः कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युदरात घट झाली ही एकीकडे समाधानकारक बाब असली तरी दुसरीकडे कोरोना संसर्गाचा धोका मात्र कायम आहे. सर्वत्र अनलॉक सुरू झाल्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. मृत्युदर घटत असला तरी रुग्णांची होणारी वाढ अद्याप थांबली नाही. गेल्या आठवडाभरात तब्बल दोन हजार ३६७ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही कोरोना संसर्गाचा धोका कायम चिंता वाढविणारा आहे. 

मार्चपासून कोरोनाचा एक एक रुग्ण वाढायला शहरात सुरवात झाली. एका जुलै महिन्यात जिल्ह्यात आठ हजार ८४० रुग्णांची नव्याने भर पडली. या काळात २१८ कोरोनाबाधितांचा मृत्यूही झाला. मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै या पाच महिन्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण हे जुलै महिन्यातच आढळून आले. साधारणतः जूनअखेरीसपासून कोरोना रुग्णांची संख्या गतीने वेग घेण्यास सुरवात झाली. दरम्यान, कोरोना संसर्गाची वाढती साखळी लक्षात घेता ती खंडित करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधींनी एकत्र बैठकीतून १० ते १८ जुलैदरम्यान शहरात शंभर टक्के लॉकडाउन जाहीर केला.

 आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार

या काळात महापालिकेने अँटीजेन व आरटीपीसीआर टेस्टची मोहीम हाती घेतली. त्यासाठी टास्क फोर्ससह मोबाईल टीम शहरांतर्गत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची कोरोना चाचणी व क्वॉरंटाइन करण्यावर भर दिला. दुसरीकडे शहराच्या एंट्री पॉइंटवर सहा चेकपोस्ट तयार करून बाहेरून येणाऱ्यांचीही तपासणी सुरू केली.

लॉकडाउननंतरही ही मोहीम आजतागायत सुरूच आहे. व्यापारी, विक्रेत्यांचीही अँटीजेन टेस्ट केली जात आहे. या उपाययोजनांमुळे शहरात संसर्गाची साखळी काही प्रमाणात खंडित झाल्याचे चित्र आहे. मात्र, अजूनही दररोज दोनशेहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.  एक ते आठ ऑगस्ट या आठ दिवसांत शहरात दोन हजार, ३६७ नवीन कोरोना रुग्णांची भर पडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

जेव्हा वकीलच होतो आरोपी....अन् न्यायाधीशांसमोर...

आठवडाभरात साठ बाधितांचा मृत्यू 

गेल्या आठवडाभरात साठ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. या आठ दिवसांतील एकूण रुग्णवाढ व झालेले मृत्यू यातून मृत्युदराचे प्रमाण हे २.५३ टक्के एवढे आहे. दरम्यान, शनिवारी (ता. आठ) जिल्ह्याचा मृत्युदर हा ३.२४ एवढा होता. या आठवडाभरात एकूण १,९५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बरे होण्याचे हे प्रमाण ८२.५५ टक्के एवढे आहे. ऑगस्टपासून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. ग्रामीणपैकी, औद्योगिक वसाहत असलेल्या वाळूज-बजाजनगरसह वैजापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, औरंगाबाद या तालुक्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.  

माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This City Is In Constant Danger Of Corona Aurangabad News