बिडकीनला पाचशे एकरात होणार फुडपार्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 food park will develop on 500 acres in Bidkin- CM Uddhav Thackeray
food park will develop on 500 acres in Bidkin- CM Uddhav Thackeray

औरंगाबाद : कृषी आणि उद्योग या खात्यांची सांगड घालत काही तरी चांगले करायची इच्छा आहे. याच माध्यमातून बिडकीन येथे पाचशे एकरात फूड पार्क उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

बिडकीनच्या औद्योगिक वसाहतीतील 500 पैकी 100 एकर जमीन ही महिला उद्योगांसाठी राखीव असणार आहे. येत्या जूनमध्ये त्याचे उद्‌घाटन होणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर (मसिआ)तर्फे कलाग्राम येथे आयोजित सातव्या ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो-2020चे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, एक्‍स्पो समन्वयक सुनील किर्दक यांची प्रमुख उपस्थित होती. 

या एक्‍स्पोत साडेचारशेहून अधिक विविध कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. एक्‍स्पोच्या उद्‌घाटननंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक्‍स्पोतील फुड प्रोसेसिंगसह विविध कंपन्यांच्या स्टॉलला भेट दिली. 

लघु उद्योजकांत मोठी ताकद

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ''फुड पार्कचे भूमिपूजन झाल्यावर सर्व अटी व शर्ती मंजूर करून हे काम लवकरात लवकर कसे पुर्ण होईल, याची खबदारी घेतली जाईल. लघु उद्योजकांच्यात मोठी ताकत आहे, हे या प्रदर्शनातून कळले. हातात करण्याची ताकत असतानाही ताकत देणारे अधिकार नव्हते.''

''दोन दिवसांपूर्वी देशातील मोठ्या उद्योजकांची मुंबईत भेट घेतली. यातील जवळपास सर्वच मुंबईतील आहे, याचा अभिमान वाटतो. त्यांच्याशी चर्चा करतांना 'आम्ही करू शकतो, पण सरकार ऐकतच नाही' अशी त्यांची प्रतिक्रिया होती. आम्ही विरोधी पक्षात होतो, तेव्हा आम्हीही म्हणायचो बेकार सरकार आहे. पण आता तसे म्हणता येणार नाही. आताचे सरकार हे उद्योजकांना त्यांच्या पायावर खंबीरपणे उभे करणारे आहे,'' असा दावाही त्यांनी केला.

आम्हालाही अडचणी आल्या

''अडीअडचणी खूप आहेत, प्रत्येक क्षेत्रात त्या असतात. आम्हालाही सरकार स्थापन करताना अडचणी होत्या, पण त्याच्यावर आम्ही मात केलीच ना, तशी संकटावर मात करून पुढे जाण्याची हिंमत आणि जिद्द पाहिजे. महत्वाकांक्षा असेल, तर संकटे कितीही येऊ दे त्यावर मात करता येते. इथला उद्योजक अडचणीवर मात करेलच,'' अशी अपेक्षाही उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली. 

देशाचे लक्ष वेधू शकते असे हे प्रदर्शन असल्याचा गौरवोल्लेख करतांना ठाकरे म्हणाले, ''देशातील उद्योजक इथे आले आहेत. येत्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवता येईल असे केंद्र तुम्हाला उभारून देणार म्हणजे देणारच. उद्योजक म्हणजे मराठवाड्याची ताकद आहे. त्या योग वापर झाला पाहिजे, केवळ प्रदर्शन बघून फायदा होणार नाही. तर सर्व अडचणीवर मात करून उद्योग विश्‍व निर्माण करणाऱ्या उद्योजकांना प्रेरणा देण्याचे काम सरकार म्हणून आम्ही करू.''

शेतकऱ्यांना चिंतामुक्‍त करणार 

जागतिक मंदी आहे, देशात मंदी आहे म्हणून रडत बसलो तर लढू शकणार नाही. रडणारे कधीच लढू शकत नाहीत. जो लढतो तो जगतो, महाराष्ट्राला लढण्याची परंपरा आहे. आज शेतकरी अडचणीच आहे, याला कर्जमुक्‍त करणार आहे. नुसतेच कर्जमुक्‍त नाही तर चिंतामुक्‍तही करणार याचा पुनरुच्चारही ठाकरे यांनी केला. 

उद्योगाच्या अडचणी सोडविणार 

उद्योजकांच्या समस्या सोडवण्या बरोबरच पारंपारिक उद्योग आणि कौशल्यावर आधारित उद्योग निर्मितीची गरज आहे. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या मला कागदावर लिहून द्या असे आवाहन करतांनाच प्रदर्शनातील उद्योगाजकांसाठी प्रत्येक खात्यातून मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करू असे आश्‍वासन देखील उध्दव ठाकरे यांनी उपस्थितांना दिली. 

भूमिपुत्रांसाठी कौशल्य विकास संकुल 

शेंद्रा येथील ऑरीक सिटीमध्ये येणाऱ्या नवीन उद्योगांसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांना प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शेंद्रा येथे आधुनिक कौशल्य विकास संकुल तयार केले जाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com