
औरंगाबाद महापालिका प्रशासनाने आजपर्यंत शहरात एकूण १ लाख २५ हजार ३०२ कोरोना चाचण्या घेतल्या आहेत. यात ८६ हजार ८१० अॅन्टिजेन टेस्ट, १ हजार ६९८ आरटीपीसीआर टेस्ट व ३६ हजार ४८९ नियमित कोरोना चाचण्यांचा समावेश आहे.
औरंगाबाद -: कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घेतलेला नऊ दिवसांचा लॉकडाऊन तसेच अॅन्टिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांना दिलेल्या गतीमुळे कोरोना चाचण्यात औरंगाबाद महापालिका राज्यात आघाडीवर आहे. राज्यशासनाने केलेल्या सूचनेप्रमाणे प्रत्येक कोरोना रुग्णांच्या संपर्कातील १५ पेक्षा अधिक व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करणे व क्वॉरंटाइन करण्यातही महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे शहराचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रेशो १७.५७ वर पोचला आहे.
शहरात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. जून आणि जुलैमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढीचे प्रमाण लक्षणीय वाढले होते. तसेच कोरोनामुळे मरणाऱ्यांचीही संख्या वाढली होती. कोरोनाचा मृत्यूदर हा ५.४ टक्क्यांच्या वर पोचला होता. त्यामुळे केंद्रासह राज्य शासनानेही चिंता व्यक्त करून महापालिकेच्या यंत्रणेने कोरोना रुग्णांची वाढती संख्या व मृत्यूदर कमी करण्याचे निर्देश दिले होते.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
दरम्यान जूनअखेरीस राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांना अॅन्टिजेन टेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करण्याची सूचना केली. त्यानंतर आयुक्तांनी लॉकडाऊनचा निर्णय घेऊन या काळात अॅन्टिजेन व आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार १० ते १८ जुलै दरम्यान या चाचण्यांसाठी महापालिकेची टास्क फोर्स पथके, मोबाइल टीम, एन्ट्री पॉइंटवर सहा पथके याप्रमाणे ३९ पथके नियुक्त करून कोरोना रुग्ण शोधून काढले. तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनाही क्वॉरंटाइन करून त्यांच्याही कोरोना चाचण्या केल्या. लॉकडाऊन संपल्यानंतर व्यापाऱ्यांसह नागरिकांच्या कोरोना चाचण्यांसाठी आजपर्यंत युद्धस्तरावर महामोहीम राबविली जात आहे. दरम्यान, औरंगाबाद महापालिकेने सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्याचा विक्रम केला. शनिवारी ( ता.एक ) महापालिकेच्या अहवालानुसार शहराचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रेशो हा १७.५७ एवढा नोंदला गेला आहे. तर प्रति दशलक्ष नागरिकांमागे १ लाख ४ हजार ४१८ कोरोना चाचण्याही महापालिकेने केल्या आहेत.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
आजपर्यंत सव्वालाख कोरोना चाचण्या
महापालिका प्रशासनाने आजपर्यंत शहरात एकूण १ लाख २५ हजार ३०२ कोरोना चाचण्या घेतल्या आहेत. यात ८६ हजार ८१० अॅन्टिजेन टेस्ट, १ हजार ६९८ आरटीपीसीआर टेस्ट व ३६ हजार ४८९ नियमित कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. तर मागील काही दिवसांत शहराचा रिकव्हरी रेट हा ७५.७५ टक्क्यांवर पोचला आहे. शनिवारी ( ता. एक ) महापालिकेकडून प्राप्त अहवालानुसार एकूण चाचण्यांतून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १० हजार ६८० एवढी झाली आहे. कोरोनामुळे ४१९ जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. मृत्युदराचे हे प्रमाण ४.०४ टक्के एवढे नोंदले गेले आहे.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा