गावे, वाड्या, वस्ती झाल्या हाऊसफुल्ल 

गावे, वाड्या, वस्ती झाल्या हाऊसफुल्ल 

औरंगाबाद : रोजगार, नोकरी, शिक्षण, मजुरीसाठी ग्रामीण भागातील अनेक जण मुंबई, पुणे, पश्‍चिम महाराष्ट्राचा रस्ता धरतात तर काही जण जवळच्या शहरात कामाच्या शोधासाठी स्थलांतर करतात. एकदा शहराच आल्यावर पुन्हा ते गावाकडे जाण्याचे नाव काढत नाहीत; मात्र कोरोनामुळे सर्वच जणांनी आपल्या गावाचा रस्ता धरला असून गावे, वाड्या, वस्त्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत.

कामाच्या शोधात पश्‍चिम महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्हे, परराज्यात गेलेले बहुतांश जण कोरोनाच्या धास्तीने सहकुटुंब गावाकडे परतले आहेत. कित्येक वर्षे गावाचे तोंड न बघितलेसुद्धा गावात परतले आहेत; मात्र परत आलेल्यांना ग्रामपंचयातीमध्ये नोंदणी करावी लागत आहे. शिवाय काही जणांना तपासणी करून घरातच राहावे लागत आहे. 

राज्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्या देण्याचा निर्णय झाल्यापासून गावाकडे सर्वांनी धाव घेण्यास सुरवात केली होती. यानंतर राज्यात जमावबंदी जाहीर झाल्याने काही ठिकाणी कामे बंद पडल्याने मजुरांनीसुद्धा गावाचा रस्ता धरला. त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे सर्वच ठिकाणी काम बंद झाल्याने बहुतांश जणांनी मिळेल त्या वाहनाने आपले गाव गाठले आहे.

मराठवाड्यातील अनेक जण नोकरी, शिक्षणासाठी पुणे, मुंबईची वाट धरतात. तसेच ऊसतोड मजूरसुद्धा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहेत. सध्या कोरोनाची धास्ती जास्त प्रमाणात वाढल्याने शिवाय कामच शिल्लक राहिलेले नसल्याने उपासमार टाळण्यासाठी सर्वच जण गावात परतले आहेत. 

ग्रामीण भाग सध्या गजबजला असून, सगळे जण आपल्या कुटुंबासोबत एकत्र आले आहे. काही जण शेतात जाऊन कामे करताना दिसतात. आता पुढे काय होईल, पुन्हा कामासाठी परत जाता येईल की नाही, याची शाश्‍वती नसल्याने अनेक जण गावातच मुक्काम ठोकण्यावर विचार करीत आहेत.

ज्यांच्याकडे पुरेशी शेती आहे त्यांनी आता शेतीकडेच जास्त लक्ष देण्यावर भर दिला आहे. सध्या तरी कोरोनामुळे नेहमीच ओस राहणारी गावे, वाड्या, वस्त्या कुटंबातील सर्वच सदस्यांनी भरलेल्या आहेत. 

नोकरी करणाऱ्यांचे शेतीत काम 

वर्षांनुवर्षे शहरात राहून नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांनी पुन्हा गाव गाठल्यानंतर काही जण आता शेतात जाऊन पूर्वीप्रमाणे कामे करीत आहेत. जनावरांना चारा, पाणी तसेच शेतीत कुटुंबासोबत कामे करीत आहे. काही जणांना गावातच घरात बसून राहणे अवघड होत असून, ते शेतात जाऊन कामे करीत आहेत. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com