ती मुलीच्या घरून परतील आणि....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

शहरातील इटखेडा भागात महिला पॉझिटिव्ह आढळली. ही महिला आठवडाभरापूर्वी मुकुंदवाडीतील संजयनगर भागात राहत असलेल्या मुलीकडून परतली होती. त्याचवेळी तिला सर्दी, ताप, खोकला असल्याचे निदर्शनास आले. सोमवारी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

औरंगाबाद : शहराच्या नवनवीन भागात कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. सोमवारी (ता. २५) इटखेडा, गजानन मंदिर परिसर, मयूरनगर भागात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यानंतर महापालिकेने त्या भागातील रस्ते सील करून परिसरात जंतुनाशक औषधी फवारणी केली. एका महिलेला मुलीकडून परत आल्यानंतर कोरोना झाल्याचे समोर आले आहे.  

शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत काही दिवसांपासून घट होत आहे. मात्र शहराच्या वेगवेगळ्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येतच आहेत. अनेकांना संपर्कातून संसर्ग होत आहे. सोमवारी इटखेडा भागात महिला पॉझिटिव्ह आढळली. ही महिला आठवडाभरापूर्वी मुकुंदवाडीतील संजयनगर भागात राहत असलेल्या मुलीकडून परतली होती. त्याचवेळी तिला सर्दी, ताप, खोकला असल्याचे निदर्शनास आले. रविवारी या महिलेचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला असल्याचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या भागातील रस्ते सील करण्यात आले असून जंतूनाशक औषधीची फवारणी करून घेण्यात आली आहे. या महिलेच्या संपर्कात असलेल्या नातेवाईकांचे स्वॅब घेण्यात आले असल्याचे श्री. घोडेले यांनी सांगितले. तसेच गारखेडा भागातील गजानन मंदिर परिसरातही कोरोनाचा रुग्ण आढळून आला.

या व्यक्तीला संपर्कातल्या संपर्कातून लागण झाली आहे. मयूरनगर भागात अद्यापपर्यंत एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळून आलेला नव्हता मात्र सोमवारी या भागात कोरोनाने शिरकाव केला. एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे समोर येताच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले. महापालिकेसह पोलिसांनी मयूरनगरमध्ये धाव घेऊन परिसरातील रस्ते सील केले. त्यानंतर जंतूनाशक औषधीची फवारणीही करण्यात आली. 

किलेअर्क येथून ५३ जणांना सुटी 
कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, पॉझिटीव्ह अहवाल मात्र कमी होत आत. सोमवारी (ता. २५) किलेअर्क येथील कोविड केअर सेंटरमधून तब्बल ५३ जणांची सुटी झाली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आयुक्तांनी साधला संवाद

किलेअर्क येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना काय अडचणी आहेत, याची माहिती पांडेय यांनी घेतली. जेवण, पिण्याचे पाणी वेळेवर मिळते का? स्वछता व्यवस्थित आहे का? याची विचारणा केली. त्यावर एकाने इतर सुविधा चांगल्या आहेत मात्र पाणी वेळेवर मिळत नसल्याचे पांडेय यांना सांगितले. यावेळी पांडेय म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाने हॅंडसॅनिटायझर किंवा साबणाने हाथ धुणे, मास्कचा वापर व सुरक्षित अंतर व कमीत कमी घराबाहेर पडणे या बाबींचा अवलंब केला तर सुरक्षित राहू. शासनाच्या नव्या आदेशानुसार ज्या रुग्णांना दहा दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे नाहीत, त्रास होत नाही अशा रुग्णांना देखील घरी पाठवण्यात येणार आहे, असे पांडेय यांनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad