औरंगाबादकरांना दिलासा... ८६ टक्के संशयितांना नाही लागण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

शहरात आत्तापर्यंत ११ हजार ९९१ जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी १० हजार ४२० नमुने कोरोना निगेटिव्ह आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. अहवाल निगेटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ८६.८९ एवढे आहे. 

औरंगाबाद : शहरात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी चाचण्या घेण्याचे प्रमाण व पॉझिटिव्ह अहवाल येणाऱ्यांची संख्या यात मोठी तफावत आहे. शहरात आत्तापर्यंत ११ हजार ९९१ जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी १० हजार ४२० नमुने कोरोना निगेटिव्ह आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. अहवाल निगेटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ८६.८९ एवढे आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त नमुने घेण्यात यावेत, असे वारंवार सांगितले जाते. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेचा कोरोना चाचणीत वरचा क्रमांक असल्याचा दावा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी वारंवार केला. कोरोना संशयितांच्या लाळेचे नमुने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी घेतले जातात. नमुने घेतल्यानंतर अहवाल चोवीस तासांत उपलब्ध करून दिला जातो.

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

३१ मेपर्यंत घाटीच्या माध्यमातून ११२१ जणांचे लाळेचे नमुने घेण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून २,५५७ नमुने घेण्यात आले तर महापालिकेच्या माध्यमातून ७,५६७ जणांचे लाळेचे नमुने घेण्यात आले. असे एकूण ११ हजार ९९१ जणांचे लाळेचे नमुने घेण्यात आले. यापैकी १० हजार ४२० जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. १४८३ पॉझिटिव्ह आले असून, ८८ नमुन्यांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत, असे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

चार लाख ९० हजार जणांचे स्क्रीनिंग 
कोरोना संसर्ग असलेल्या व्यक्तीला ताप असतो. त्यामुळे स्क्रीनिंग केल्यानंतर ताप आहे किंवा नाही हे लक्षात येते. कोरोनाची साथ पसरल्यापासून महापालिकेतर्फे स्क्रीनिंग केले जात आहे. आत्तापर्यंत चार लाख ९० हजार ६९४ जणांचे स्क्रीनिंग करण्यात आले. त्यात महापालिकेच्या पदमपुरा येथील स्क्रीनिंग सेंटरमध्ये चार लाख ६७ हजार ७२१ जणांचे स्क्रीनिंग करण्यात आले.

तेरा फिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून ४७३७ जणांचे स्क्रीनिंग करण्यात आले. खासगी दवाखान्यांच्या माध्यमातून १३ हजार ६७६ जणांचे तर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून ४५६० जणांचे स्क्रीनिंग करण्यात आले. त्यांपैकी २१६० जणांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले, असेही अहवालात नमूद आहे. 

हेही वाचा: बाहेरून आले अन् रुग्ण वाढले - चिरंजीव प्रसाद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad