कोरोना पोचला तब्बल अडीचशे वसाहतींमध्ये 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

आठवडाभरापूर्वी सुमारे दोनशे वसाहतींत कोरोनाचे रुग्ण आढळले होते. मात्र, आजघडीला सुमारे अडीचशे वसाहतींत कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागासह यंत्रणेची चिंता वाढली आहे. महापालिकेने दिलेल्या अहवालानुसार शहरातील २४२ वसाहतींत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

औरंगाबाद : शहरात लॉकडाउन असतानाही रुग्णांची संख्या भरमसाट वाढली. त्यात एक जूनपासून लॉकडाउन टप्प्याटप्याने शिथिल केला जात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून, आजपर्यंत शहरातील सुमारे अडीचशे वसाहतींमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे उपाययोजना करताना महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. 

शहरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. सहा दिवस फक्त आरोग्यसेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आली. त्यामुळे काही दिवस रुग्णांची संख्या कमी-कमी होत होती. दरम्यान, जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू झाली. एक जूनपासून पुन्हा शिथिलता दिली जात आहे. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या चार दिवसांपासून रोज ५० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. तसेच नवनवीन वसाहतींमध्ये कोरोनाचा शिरकाव सुरू आहे.

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही...  

आठवडाभरापूर्वी सुमारे दोनशे वसाहतींत कोरोनाचे रुग्ण आढळले होते. मात्र, आजघडीला सुमारे अडीचशे वसाहतींत कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागासह यंत्रणेची चिंता वाढली आहे. महापालिकेने दिलेल्या अहवालानुसार शहरातील २४२ वसाहतींत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी ९३ वसाहतींमध्ये केवळ एकच रुग्ण आढळलेला आहे. यातील अनेक वसाहती या उच्चभ्रू आहेत. ज्या भागात दाट लोकवस्ती आहे तिथे मात्र दुहेरी आकड्यांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. म्हणून प्रशासनाला अशा वसाहतींमध्ये रुग्णसंख्या कमी करण्यासाठी अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

देवडी बाजार, टीव्ही सेंटर भागांत आढळले रुग्ण 
शहरात नवीन वसाहतीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. सिडको एन-सहामधील शुभश्री कॉलनीत एक बाधित सापडला, तर देवडी बाजार वसाहतीतही एकजण पॉझिटिव्ह आढळून आला. मोगलपुरा भागात दोघांना तर टीव्ही सेंटर परिसरात एकाला कोरोना बाधा झाली आहे. जवाहर कॉलनी, बुढीलेन, औरंगपुरा भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने हे भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. जवाहर कॉलनी परिसरात आतापर्यंत बाधितांचा आकडा दहावर पोचला आहे. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला असून, कामाशिवाय घराबाहेर पडू नका, मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, अशा सूचना नागरिकांना केल्या जात आहेत. 

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad