औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक निगेटीव्ह; माजी नगरसेवकाला लागण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला आहे. 

औरंगाबाद : पडेगाव-मिटमिटा परिसरातील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांचा कोरोना अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. 

पडेगाव मिटमिटा परिसरातील शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाला दोन दिवसांपासून त्रास सुरू झाला होता. त्यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली होती. घाटी रुग्णालयातून त्यांना गुरुवारी सकाळी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. 

प्रशासकांची अहवाल निगेटिव्ह 
महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या शासकीय निवासस्थानातील कुकला कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे श्री. पांडेय व त्यांच्या पत्नी, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व अन्य कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांची बुधवारी (ता. २४) कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अहवाल निगेटिव्ह आला असला तरी चार दिवस क्वारंटाईन राहणार आहे, अशी माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे. चार दिवसानंतर पुन्हा त्यांचा स्वॅब घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले. 

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

केशरसिंगपुरा, शिवाजीमंडी, उदय कॉलनीत रुग्ण 
शहरासह जिल्ह्यातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, गुरुवारी (ता. २५) केशरसिंगपुरा, शिवाजीमंडी, संत तुकारामनगर, उदय कॉलनी या नवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडले. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे बाधित व संशयित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. केशरसिंगपुरा येथे चार, सिडको एन-दोनमधील संत तुकारामनगर तीन, जुने पडेगाव येथे चार, नारेगावातील शिवाजीमंडी येथे एक, चिकलठाण्यातील बौद्धवाडा एक, उदय कॉलनी एक याप्रमाणे नवीन वसाहतींमध्ये रुग्ण आढळून आले. तसेच गारखेडा, मुकुंदवाडी आणि चिकलठाणा परिसरात सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. 

कृती दलात ३९ कर्मचारी 
कोरोना रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींना क्वॉरंटाइन करण्यासाठी प्रभागनिहाय नऊ टास्क फोर्स पथके कार्यरत करण्यात आली आहेत. त्यासाठी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार यांनी ३९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदली केलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर हजर राहून अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या. 

सारीचे दहा रुग्ण आले पॉझिटिव्ह 
सारीचे (सिव्हिअरली अ‍ॅक्युट रेस्परेटरी इलनेस) रुग्ण वाढतच आहेत. नव्याने २० रुग्ण आढळून आले असून, यातील दहाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सारीचे आजपर्यंत जिल्ह्यात ६९० रुग्ण आढळले आहे. त्यापैकी ६८७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. २०६ रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले तर ४७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सातजणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत; तसेच आतापर्यंत १७ जणांचे बळी गेले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad