
कोरोनाची चाचणी घेण्यासाठी गेलेल्या पथकातील अधिकाऱ्यांना पाहताच नागरीकांनी घरांच्या दारे, खिडक्या बंद करून घेतल्या. जे नागरिक समोर होते, त्यांनी आजार नसताना तपासणी कशासाठी करायची असा प्रश्न केला.
औरंगाबाद ः आम्हांला कोणतीही लक्षणे नसताना कोरोना चाचण्या घेता कशासाठी? असा जाब विचारत गुरुवारी (ता. ३०) महापालिकेच्या आरोग्य पथकाला शहरातील आंबेडकरनगर, फुलेनगर, अयोध्यानगर व मयुरपार्क येथे नागरिकांनी विरोध केला. फुलेनगर भागात आशा स्वयंसेविकांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेतर्फे जास्तीत जास्त कोरोना चाचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र या पथकांना काही भागात चांगला प्रतिसाद मिळत असला तरी काही भागात मात्र तीव्र विरोध होत आहे. गुरुवारी महापालिकेचे पथक आंबेडकरनगर, फुलेनगर भागात गेले असता नागरीकांनी विरोध केला. कुठलीही लक्षणे नसताना, चाचण्या करताच कशाला? चाचण्यांसाठी आलो आणि आम्हांला कोरोना झाला तर...? साधी सर्दी झाली तरी, अहवाल पॉझिटिव्ह कसे येतात? असे प्रश्न करून नागरिकांनी भंडावून सोडले.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
यावेळी अप्पर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, अण्णासाहेब शिंदे, महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह वॉर्ड अधिकाऱ्यांनी परिसरात फिरून नागरीकांना कोरोनाबाबत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकातील अधिकाऱ्यांना पाहताच नागरीकांनी घरांच्या दारे, खिडक्या बंद करून घेतल्या. जे नागरिक समोर होते, त्यांनी आजार नसताना तपासणी कशासाठी करायची असा प्रश्न केला. दरम्यान येथे दिवसभरात केवळ २१ जणांच्या चाचण्या झाल्या होत्या. असाच प्रकार अयोध्यानगर, मयूरपार्क भागामध्येही घडला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुन्हा दाखल करण्याची तयारी
आंबेडकरनगर-फुलेनगर येथे पथकातील कर्मचाऱ्यांना नागरिकांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान धक्काबुक्की झालेल्या आशा स्वयंसेविका आणि कर्मचारी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
कोरोनामुक्त झालेल्यावर बहिष्कार
कोरोनाची भीती दूर करण्यासाठी प्रशासनातर्फे कोरोनामुक्त झालेल्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अशा व्यक्तींना तुम्ही गल्लीत फिरायचे नाही? असे म्हणत नागरिक त्यांच्याशी बोलणे देखील टाळत असल्याचे चित्र शहराच्या काही भागात आहे.