सावधान...लक्षणे नसलेले हजारो रुग्ण सोबत घेऊन फिरताहेत कोरोना 

माधव इतबारे
Wednesday, 26 August 2020

शहरात समूह संसर्गाला सुरवात झाली आहे, असे मत सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरिकांना सावध होण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. 

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी फक्त १२ टक्के नागरिकांमध्येच प्रतिकारशक्ती तयार झाल्याचे सिरो सर्वेक्षणातून समोर आले आहे. हजारो जण कोरोनाची बाधा होऊन उपचाराविना बरे होत आहेत तर हजारो जणांना लक्षणेच नसल्याने ते शहरात फिरत आहेत. त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका आता वाढला आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासंदर्भात उपाययोजनांची दिशा ठरविण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर शहरात सिरो सर्वेक्षण करण्यात आले. १२ टक्के म्हणजे एक लाख ७० लोकांमध्ये कोरोना विषाणूशी लढण्यासाठी अँटीबॉडी तयार झाल्याचे त्यातून आढळून आले. म्हणजेच या नागरिकांना कोरोना होऊन गेलेला आहे. उपचार न घेताच ते बरे झाले आहेत. अनेकांना आपल्याला काही त्रास झाला याचीसुद्धा जाणीव झालेली नाही. त्यामुळे असेच हजारो लक्षणविरहित रुग्ण शहरात वावरत असावेत, असा अंदाज बांधला जात आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अनेकांना तुमचा पॉझिटिव्ह रुग्णाशी संपर्क आला होता का हेही सांगता आले नाही. ८१ टक्के लोकांनी आपला पॉझिटिव्ह रुग्णाशी संपर्क आला नसल्याचे म्हटले आहे. म्हणजेच शहरात समूह संसर्गाला सुरवात झाली आहे, असे मत सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरिकांना सावध होण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. 

सारीच्या आणखी १५ रुग्णांची भर 
कोरोना’पाठोपाठ सारीच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. एका दिवसात तब्बल १५ रुग्ण आढळून आले आहेत. यातील १० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. शहरात सारीचे एकूण १३९४ रुग्ण आढळले आहेत. यापैकी तब्बल १३०४ जणांची नोंद खासगी रुग्णालयांतून महापालिकेला प्राप्त झाली आहे. ८२ जण घाटी रुग्णालयात आढळले आहेत. यातील १३८६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, ५२६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ८५४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सहाजणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत सारीने १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

 

सिरो सर्वेक्षणातून अँटीबॉडीज आढळून आलेल्या ८१ टक्के लोकांना कुठून बाधा झाली हे समजू शकले नाही. हे सर्वजण उपचाराशिवाय बरे झालेले आहेत. असे आणखी नागरिक असतील. ते कोरोनाचे वाहक ठरतात. त्यामुळे आणखी सतर्क होऊन काळजी घ्यावी लागणार आहे. 
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad