पीपीई किट घालणारे डॉक्टरही नाहीत सुरक्षित, झाली एवढ्या जणांना बाधा 

माधव इतबारे
Thursday, 27 August 2020

कोरोनाबाधित रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी चोवीस तास सज्ज असलेले डॉक्टर, त्यांना सहकार्य करणाऱ्या नर्स व इतर कर्मचारी यांना देखील कोरोनाचा धोका वाढत आहे.

औरंगाबाद ः कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व त्यांना सहकार्य करणारे कर्मचारीच संसर्गाला बळी पडत आहे. गेल्या पाच महिन्यांत शासकीय, महापालिका व खासगी रुग्णालयातील तब्बल ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील दोन डॉक्टरांचा बळीही गेला आहे तर एकूण बाधित डॉक्टरांची संख्या २१२ एवढी आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून प्रशासनातर्फे उपाययोजना सुरू आहेत; मात्र कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. सध्या शहरात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू असल्याचे सिरो सर्वेक्षणातून समोर आले. त्यामुळे बाधितांची आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी चोवीस तास सज्ज असलेले डॉक्टर, त्यांना सहकार्य करणाऱ्या नर्स व इतर कर्मचारी यांना देखील कोरोनाचा धोका वाढत आहे. गेल्या पाच महिन्यांत दोन डॉक्टरांचा बळी गेल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

रोशनगेट व सिडको एन-तीन भागातील हे अनुक्रमे ७३ व ७१ वर्षे वयाचे हे डॉक्टर होते. या डॉक्टरांसह पाच महिन्यांत तब्बल ३०१ आरोग्य विषय सेवा देणाऱ्या डॉक्टर कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात महापालिकेचे २८, घाटी व मिनी घाटीतील ९५ तर खासगी रुग्णालयातील १७८ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १९५ जणांची रुग्णालयातून सुटी झाली असून, १०६ जण अद्याप उपचार घेत असल्याचे सोमवारच्या (ता. २४) अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

डॉक्टरांची संख्या दोनशेपेक्षा जास्त 
बाधितांमध्ये सर्वाधिक डॉक्टरांचा समावेश आहे. तब्बल २१२ पेक्षा जास्त डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासोबतच परिचारिका, आशा स्वयंसेविका, एमपीडब्ल्यू, एनएनएम, आरोग्यसेवक, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, पर्यवेक्षक यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. प्रत्येक रुग्णालयात पीपीई किट, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जात असले तरी डॉक्टरच कोरोनाबाधित होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

बाधित डॉक्टर 
महापालिका- ०२ 
घाटी रुग्णालय- ७३ 
खासगी रुग्णालये- १३५ 
एकूण २१२ 

आरोग्य कर्मचारी 
महापालिका-२६ 
घाटी रुग्णालय- २३ 
खासगी रुग्णालय-४० 
एकूण ८९ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad