प्रवाशांची गर्दी थांबता थांबेना... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

जिल्हाबंदीचे आदेश राज्य शासनाने काढले असले तरी अत्यावश्‍यक कामे असलेले नागरिक पोलिसांची परवानगी घेऊन प्रवास करत आहेत. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर अद्याप गर्दी असल्याचे चित्र आहे. 

औरंगाबाद : शहरात पुणे, मुंबई, नाशिकसह इतर ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांचे महापालिकेमार्फत स्क्रिनिंग केले जात आहे. संचारबंदी असताना देखील गेल्या चोवीस तासात तीन हजार ५३० प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्हाबंदीचे आदेश राज्य शासनाने काढले असले तरी अत्यावश्‍यक कामे असलेले नागरिक पोलिसांची परवानगी घेऊन प्रवास करत आहेत. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर अद्याप गर्दी असल्याचे चित्र आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्याच्या सीमा बंद करून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या पाठापाठोपाठ केंद्र शासनाने देखील संपूर्ण देशभर लॉकडाऊनचा निर्णय घेतला. देशातील नागरिक ज्या भागात आहेत तिथेच त्यांनी थांबावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मात्र अद्याप अनेकांचा प्रवास सुरूच आहे. महापालिकेने शहरात येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार मध्यवर्ती, सिडको बसस्थानक, रेल्वेस्टेशनसह नगरनाक, छावणी, हर्सूल, केंब्रीज शाळा, पैठण बायपास येथे तपासणी केली जात आहे. दरम्यान सार्वजनिक वाहतूक बंद झाल्यामुळे बसस्थानक व रेल्वेस्टेशन येथील स्क्रिनिंग बंद करण्यात आले असले तरी तीन ठिकाणी तपासणी सुरूच आहे. याठिकाणी रोज सुमारे तीन ते साडेतीन हजार प्रवाशांची तपासणी केली जात आहे. गुरुवारी (ता. २६) दुपारी दोन ते शुक्रवारी (ता. २७) दुपारी दोन या काळात तीन हजार ५३० जणांची तपासणी करण्यात आली असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. 
 
आत्तापर्यंत एक लाख प्रवाशांची तपासणी 
विमानतळासह शहरात प्रवेश करणाऱ्‍या पैठण-बीडबायपास, हर्सूल टी पॉइंट, जालना रोडवरील केंब्रिज चौक, मुंबई-पुणे मार्गाकडील छावणी नगर नाका या ठिकाणी महापालिकेने स्क्रिनिंग सेंटर २४ तास तैनात ठेवले आहे. १८ मार्चपासून ते २६ मार्चपर्यंत एक लाख ५७६ प्रवाशांचे स्क्रिनिंग या सेंटरवर करण्यात आले आहे. 

१०८ जण होम कोरंटाईन 
शहरात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नसला तरी विदेशातून आलेल्या नागरिकांना महापालिकेने होम कोरंटाईन केले आहे. हा आकडा अद्याप १०८ एवढा आहे. तसेच ११ जण कलाग्राम येथे कोरंटाईन करण्यात आले आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad