कोरोना रोखण्यासाठी औरंगाबाद महापालिका करतेय काय... वाचा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

गेल्या तीन दिवसात १५ टँकर म्हणजेच सुमारे दीड लाख लीटर औषधी फवारण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. २७) सिडको एन-१, मुकूंदवाडी, ठाकरेनगर भागात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी औषधी फवारणी केली. 

औरंगाबाद : शहरात कोरोना व्हायरसचे नवे रुग्ण आढळून आले नसले तरी साथीचे आजार रोखण्यासाठी महापालिकेने शहरातील मुख्य चौक, गर्दीच्या ठिकाणी जंतुनाशक औषधीची फवारणी सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसात १५ टँकर म्हणजेच सुमारे दीड लाख लीटर औषधी फवारण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. २७) सिडको एन-१, मुकूंदवाडी, ठाकरेनगर भागात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी औषधी फवारणी केली. 

शहरात कोरोना व्हायससच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अलगीकरण, विलगीकरण वॉर्ड उभारणे, याठिकाणी सर्व सोयी पुरविणे अशी कामे महापालिकेमार्फत केली जात आहेत. शहरात रुग्णांची संख्या वाढल्यास ऐनवेळी धावपळ नको म्हणून, सर्व तयारी करून ठेवण्यात आली आहे. सुदैवाने मागील दिवसांत एकही पॉझिटिव्ह रूग्ण निघाला नाही. मात्र आत्तापर्यंत ७८ संशयित रूग्ण आढळले आहेत. दरम्यान कोरोनासोबतच इतर साथीच्या आजारापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी मंगळवारपासून २४ महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक औषध फवारणी करण्याचा निर्णय घेतला.

या कामासाठी अग्निशमन विभागाची मदत घेतली जात आहे. मंगळवारी सायंकाळी महापालिका मुख्यालय परिसरात औषध फवारणी करण्यात आली. त्यानंतर पैठण गेट ते गुलमंडी कॉर्नर, महात्मा फुले पुतळ्यापर्यंत फवारणी केली. अग्निशमन विभागाच्या वाहनात हायपो क्लोराईड सोल्यूशन्स वन परसेंट हे औषध टाकून फवारणी केली जात आहे. मागील तीन दिवसात एक लाख ५० हजार लीटर जंतुनाशक औषधीची फवारणी करण्यात आली आहे. आजपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसर, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर व टीव्ही सेंटर, एन-११ परिसर, हडको भाजीमंडई, शहागंजसह जुन्या शहराचा संर्पूण परिसर, रेल्वेस्टेशन, पदमपुरा या भागात फवारणी करण्यात आली आहे. 

 सिडको भागात केली फवारणी 
शुक्रवारी सिडकोतील एन-१, मुकूंदवाडी, ठाकरेनगर परिसरात फवारणी केल्याचे घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले. घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे, अग्‍निशमन विभागाचे प्रमुख आर.के. सुरे यांच्या नेतृत्वात स्वच्छता निरीक्षक विशाल खरात, सचिन भालेराव, जवान, नागरी मित्र पथकाचे कर्मचारी पाच बंबांद्वारे फवारणी केली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad