esakal | दिल्लीहून परतलेल्या भाविकांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

आतापर्यंत १४४ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या शाळांमध्ये ९० जणांच्या राहण्याची व्यवस्था केल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (ता. दोन) सांगितले. 

दिल्लीहून परतलेल्या भाविकांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : दिल्लीमधील निजामुद्दीन भागात झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमावरून शहरात परतलेल्या सात जणांना कलाग्राम येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध महापालिकेतर्फे घेतला जात असून, आतापर्यंत १४४ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या शाळांमध्ये ९० जणांच्या राहण्याची व्यवस्था केल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (ता. दोन) सांगितले. 

दिल्लीच्या निजामुद्दीन भागात झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमात औरंगाबादचे २९ जण सहभागी झाल्याचे दिल्ली प्रशासनाने कळविले आहे. यातील १४ जण शहरातील आहेत. त्यानुसार या १४ जणांचा शोध घेण्यात आला असता, फक्त सात जण आढळले. त्यांची वैद्यकीय तपासणी करत कलाग्राम येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. या नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी महापालिकेतर्फे केली जात आहे. सध्या कलाग्राम येथे २० जण क्वारंटाईन करण्यात आलेले नागरिक आहेत. 

शहरात येणाऱ्यांचा ओघ कायम 
लॉकडाऊन, संचारबंदी व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आलेल्या असताना शहरात येणाऱ्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही. महापालिकेतर्फे नगर नाका, छावणी, हर्सूल, बीड बायपास, पैठणरोड या ठिकाणी शहरात येणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. या ठिकाणी चोवीस तासात तब्बल पाच हजार जणांची तपासणी करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. 

९० जणांची केली सोय 
शहरात अडकून पडलेले प्रवासी, मजुरांची राहण्याची व अन्नपाण्याची सोय केली जात आहे. गारखेडा परिसरातील महापालिका शाळेत ४० तर सिडको एन-सात येथील महापालिका शाळेत ५० जणांची सोय करण्यात आली आहे. महापालिकेने शाळांच्या इमारती उपलब्ध करून दिल्या असून, इतर सोयी-सुविधा मात्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिल्या जात आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा