आम्हांला विडी, सिगारेड मिळेल का हो... त्यांच्या प्रश्नाने अधिकारी बेजार 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

लाॅकडाऊनमुळे महापालिकेच्या शाळांमध्ये 175 जणांना ठेवण्यात आले आहे. यातील अनेक जण आम्हांला विडी मिळेल का? सिगारेट मिळेल का? येथून कधी सोडणार असे प्रश्‍न करत आहेत. त्यामुळे अधिकारी त्रस्त झाले आहेत. 

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात शहरात अनेक मजुर अडकून पडले असून, १७५ जणांच्या राहण्याची व्यवस्था महापालिका शाळेत करण्यात आली आहे. त्यांना सोयी-सुविधा मिळत नसल्याचा प्रकार सकाळने चव्हाट्यावर आणला होता. आता दोन वेळा जेवण, चहा, पाणी, नाष्टा, आरोग्य सुविधा याठिकाणी सुरू करण्यात आली आहे. मात्र विडी मिळेल का? सिगारेट मिळेल का? आम्हांला कधी सोडणार अशा त्यांच्या प्रश्‍नांनी अधिकारी त्रस्त झाले आहेत. 

लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात हातावर पोट असणारे, मोलमजुरी करणाऱ्यांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अनेक जण देशाच्या कानाकोपऱ्यात अडकून पडले आहेत. काहींनी चारशे-पाचशे किलोमीटर अंतर पायी चालून स्वतःचे गाव गाठले. ट्रक, टेम्पो किंवा मिळेल त्या वाहनांनी गावी जाणाऱ्यांना अनेकांना पोलिसांनी पकडले. कोरोना व्हारयराचा फैलाव रोखण्यासाठी लाखोंच्या संख्येने होणारे स्थलांतरण रोखण्याचे आवाहन केंद्र शासनाने राज्य शासनाला केले. राज्य शासनाने प्रशासनाला अडकून पडलेल्यांची सोय करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महापालिकेने २२ शाळांच्या इमारती उपलब्ध करून दिल्या. गारखेडा येथील शाळेत पहिल्याच दिवशी ठेवण्यात आलेल्यांना सुविधा मिळाला नसल्याचा प्रकार समोर आला होता.

याबाबत सकाळने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग आली. त्यानुसार आता दोनवेळ जेवण, चहा, फराळ, पिण्याचे पाणी, मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आले आहे. असे असले तरी आम्हांला विडी मिळेल का? सिगारेट मिळेल का? येथून कधी सोडणार असे प्रश्‍न हे सर्वजण अधिकाऱ्यांना करत आहेत. सध्या महापालिकेच्या जवाहर कॉलनी येथील शाळेत ४७ जण, गारखेडा परिसरातील शाळेत ४५ जण, सिडको एन-सात येथे ४३, सिडको एन-६ येथे ३० भावसिंगपुरा-१७, ज्युबलीपार्क येथील शाळेत १२ जण असे १७५ जण आश्रयाला आहेत. 

विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा 
‘शाळा खोल्यात कोंबाकोंबी’ या सकाळने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल न्यायालयाने घेतली असून, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व घाटीच्या अधिष्ठांताना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी (ता. चार) आढावा घेत सोयी-सुविधा वाढविण्यासंदर्भात सूचना केल्या. रविवारपासून याठिकाणी योगाचे वर्ग घेतले जाणार असल्याचे साहाय्यक आयुक्त विजया घाडगे यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad