शहरात अडकलेल्या मजूर, कामगारांना योगाचे धडे 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे या कामगार मजुरांचे समुपदेशन केले जात असून, त्यांना रोज योगाचे धडेही दिले जात आहेत. मनोरंजनासाठी क्रिकेट किट, टीव्हीचीदेखील सोय केल्याचे सहायक आयुक्त विजया घाडगे यांनी सांगितले. 

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे सुमारे १२६ कामगार, मजूर महापालिका शाळांत आश्रयाला आहेत. अनेक दिवसांपासून घरापासून दूर असल्यामुळे घरी जाण्यासाठी प्रत्येकाची तळमळ सुरू आहे. त्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे या कामगार मजुरांचे समुपदेशन केले जात असून, त्यांना रोज योगाचे धडेही दिले जात आहेत. मनोरंजनासाठी क्रिकेट किट, टीव्हीचीदेखील सोय केल्याचे सहायक आयुक्त विजया घाडगे यांनी सांगितले. 

महापालिकेच्या विविध शाळांमध्ये १२६ जण आश्रयाला आहेत. त्यात जवाहर कॉलनी येथील शाळेत ४७ जण, सिडको एन-सात येथे ४३, सिडको एन-सहा येथे ३०, भावसिंगपुरा-१७, ज्युबली पार्क येथील शाळेत १२ जणांचा समावेश आहे. गारखेडा परिसरातील शाळेत ठेवलेल्या कामगार, मजुरांना पहिल्या दिवशी कुठलीही सुविधा मिळाली नसल्याचे समोर आले होते. काही जण आजारी असताना त्यांची तपासणी झालेली नव्हती. हा प्रकार ‘सकाळ’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर न्यायालयानेदेखील दखल घेतली. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह इतरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर मात्र शाळांमध्ये सोयीसुविधा दिल्या जात आहेत. सिडको एन-सात येथील शाळेत आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे समुपदेशन, योगाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. 

जेवणाची सोय 
शाळा परिसरातील नागरिकांनी सुरवातीला मजूर, कामगारांना ठेवण्यास विरोध केला मात्र हेच नागरिक आता मदतीसाठी धावून येत आहेत. प्रत्येक जण त्यांच्या जेवणासह चहा, नाश्‍त्याची सोय करीत आहे. उर्वरित जणांना महापालिकेतर्फे सोय करून दिली जात आहे, असे विजया घाडगे यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad