व्यथा ऊसतोड मजूरांच्या ; दहा दिवसांपूर्वीचे दिलेले धान्य संपले, जनावरांसाठी दोन दिवसांचा चारा शिल्लक  

माधव इतबारे
Thursday, 16 April 2020

जनावरांसाठी फक्त दोन दिवस पुरेल एवढाच चार शिल्लक आहे, अशी व्यथा तळेगाव दाभाडी येथील कारखान्यावर अडकून पडलेल्या कामगारांनी व्यक्त केली. या कामगारांना स्वगावी परत जाण्यासाठी तीन दिवसांचा वेळ प्रशासनाने द्यावा, अशी मागणी येथील जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली आहे. 

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे राज्यातील साखर कारखाने बंद आहेत; मात्र या साखर कारखान्यांवर सुमारे साडेतीन लाख ऊसतोड कामगार अडकून पडले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दहा दिवसांपूर्वी दिलेले धान्य संपले. जनावरांसाठी फक्त दोन दिवस पुरेल एवढाच चार शिल्लक आहे, अशी व्यथा तळेगाव दाभाडी येथील कारखान्यावर अडकून पडलेल्या कामगारांनी व्यक्त केली. या कामगारांना स्वगावी परत जाण्यासाठी तीन दिवसांचा वेळ प्रशासनाने द्यावा, अशी मागणी येथील जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताच संपूर्ण देश लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ऊसतोड कामगार कारखान्यावर अडकून पडले आहेत. मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, हिंगोली; तसेच नगर व विदर्भातील काही जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख एवढी कामगारांची संख्या आहे. या ऊसतोड कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. कारखाना व्यवस्थापनाने कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. या कामगारांकडे पुरेसा अन्नधान्याचा साठा नाही. मिळणारी मजुरी व उसाच्या पेंढ्या (चारा) विकून त्यावर त्यांची गुजराण होत होती. कारखान्यांचे गाळप संपल्यानंतर या कामगारांना तांड्यावर येण्याचे वेध लागतात; मात्र या कामगारांना गावी नेण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने मुकादमदेखील हतबल झाले आहेत, असे श्री. सानप यांनी सांगितले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

तळेगाव दाभाडी येथील संत तुकाराम कारखान्यात अडकून पडलेल्या कामगारांचे मुकादम अशोक दराडे यांनी सांगितले की, कामगारांना दहा दिवसांपूर्वी तीन किलो बाजरी, तेल, तिखट, मीट, दाळी असे साहित्य देण्यात आले होते. हे साहित्य आता संपले आहे. कारखान्यापासून जवळच असलेले किराणा दुकान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांचे हाल होत आहेत. ओरड झाल्यानंतर एका मंगल कार्यालयात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र याठिकाणी शेकडो जणांच्या पंगती बसत असून, सोशल डिस्टन्सला हरताळ फासला जात आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाची भीती व दुसरीकडे पोटापाण्याची व्यवस्था नाही, अशा अवस्थेत आम्ही दिवस काढत आहोत. 

कारखान्यावर अडकून पडलेल्या कामगारांचे अन्न-पाण्याविना अत्यंत हाल सुरू असून, शासनाने त्यांना तीन दिवसांची मुदत द्यावी, यासाठी गेल्या आठ दिवसांपासून पाठपुरावा करीत आहे. हे सर्व कामगार गावी आल्यानंतर त्यांना गावाच्या वेशीवर थांबवून तिथेच त्यांची व्यवस्था केली जाईल. 
बाळासाहेब सानप, अध्यक्ष जय भगवान महासंघ. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad