esakal | पोलिस आयुक्तांना ते म्हणाले काम नको, आम्हाला जाऊ द्या घरी... 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

आणखी किती दिवस इथेच राहायचे?’ अशा शब्दांत महापालिकेच्या शाळांमध्ये अडकून पडलेल्या मजूर, कामगारांनी गुरुवारी (ता.१६) पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या. शासनाकडून आदेश येताच तुमच्या जाण्याचा मार्ग मोकळा होईल, असे आश्‍वासन आयुक्तांनी यावेळी दिले. 

पोलिस आयुक्तांना ते म्हणाले काम नको, आम्हाला जाऊ द्या घरी... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : ‘आम्हाला काम नको... आमच्या घरी जाऊ द्या, आणखी किती दिवस इथेच राहायचे?’ अशा शब्दांत महापालिकेच्या शाळांमध्ये अडकून पडलेल्या मजूर, कामगारांनी गुरुवारी (ता.१६) पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या. शासनाकडून आदेश येताच तुमच्या जाण्याचा मार्ग मोकळा होईल, असे आश्‍वासन आयुक्तांनी यावेळी दिले. 

लॉकडाउनमुळे शहरात अडकून पडलेल्या मजूर, कामगारांची राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली आहे. याठिकाणी चहा, नाष्टा, जेवण, मनोरंजनाचे साहित्य देण्यात आले असले तरी या मजूर, कामगारांना घरी जाण्याची ओढ लागली आहे. पहिल्या टप्प्यातील लॉकडाउन १४ एप्रिलला संपल्यानंतर आपल्याला घरी जाता येईल, या आशेवर सर्वजण होते; मात्र लॉकडाउन तीन मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या मजुरांचा धीर सुटला. अनेक महिला व मुलांनी रडारड सुरू केली.

महापालिकेच्या सहायक आयुक्त विजया घाडगे यांनी त्यांची समजूत काढली; मात्र ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने शेवटी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुरुवारी तीनही शाळांना भेट देऊन मजूर, कामगारांचे म्हणणे जाणून घेतले. २० एप्रिलनंतर शासनाचे आदेश येतील. त्यानंतर तुमची कामेही सुरू होऊ शकतात. त्यामुळे धीर धरा, असे आवाहन आयुक्तांनी केले; मात्र आम्हाला काम नको, परत घरी जायचे आहे, अशी मागणी मजूर, कामगार व त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी केली. लवकरच तोडगा निघेल, तोपर्यंत तुम्हाला शहर सोडता येणार नाही, असे सांगत आयुक्तांनी शाळा सोडली. यावेळी पोलिस उपायुक्त राहुल खाडे, पोलिस निरीक्षक अशोक गिरी, महापालिकेच्या सहायक आयुक्त विजया घाडगे यांची उपस्थिती होती. 

सारीचे आणखी सात रुग्ण वाढले 
सारीचे (सिव्हिअरली अ‍ॅक्युट रेस्परेटरी इलनेस) गुरुवारी (ता.१६) आणखी सात रुग्ण आढळले. यामुळे सारीच्या रुग्णांचा आकडा २०७ वर पोचला आहे. सारीमुळे आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील दहा जणांचे मृत्यू हे घाटी रुग्णालयात तर चार जणांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झाला आहे. औरंगाबाद शहरातील सुमारे १२५ रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा