औरंगाबादेत वाढणार क्वारंटाईची संख्या का ते वाचा.....

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

औरंगाबादेत आता संशयित कोविड-१९ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. कोरोनाबाधित व संशयित रुग्णांच्या परिसरातील पाच घरातील नागरिकांचे आता अलगीकरण केले जाणार आहे. 

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महापालिका प्रशासन हादरले आहे. आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी व्यापक उपाय-योजना सुरू केल्या असून, आता संशयित कोविड-१९ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. कोरोनाबाधित व संशयित रुग्णांच्या परिसरातील पाच घरातील नागरिकांचे आता अलगीकरण (क्वारंटाईन) केले जाणार आहे. त्यामुळे अलगीकरण कक्षात नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (ता. २१) कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून, शहराची परिस्थिती आणखी बिकट होईल, असे नमूद करून त्यांनी कोरोना रुग्ण आढळून आलेल्या व संशयितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना अलगीकरण केंद्रात हालविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. त्यात विधी सल्लागार अपर्णा थेटे, निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झणझण, नर्स, आरोग्य कर्मचारी, नागरी मित्र पथकाचे कर्मचारी, पोलिस उप निरीक्षक यांचा समावेश असेल.

ही समिती कोरोना संक्रमित आणि संशयित रुग्णांच्या संपर्कात आलेले लोकांचे शोध घेणे आणि त्यांना अलगीकरण केंद्रात पाठविण्याचे काम करील. संक्रमित किंवा संशयित रुग्णांच्या घरालगत किमान पाच घरांतील सर्व सदस्यांना आणि ते सदस्य ज्यांचा ज्यांचा संपर्कात आले त्यांना शोधून अलगीकरण केंद्रात पाठविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. या पथकासाठी एन-९५ मास्क, ग्लोज, पीपीई कीट, विशेष बूट असे संरक्षण साहित्य तत्काळ उपलब्ध करून द्यावा. संशयित किंवा लाळेचे नमुने घेण्यात आलेले रुग्णांचे चाचणीचे अहवाल येईपर्यंत त्यांचे संपर्कात आलेल्या लोकांना अलगीकरण केंद्रात ठेवण्यात यावे. अलगीकरण केंद्रांवर जेवण, पाणी, साबण आणि मनोरंजन साहित्य कमी पडता कामा नये. लहान मुले व मुलींसाठी दूध, बिस्कीट, खेळणीची व्यवस्था करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

समिती सदस्य राहणार हॉटेलमध्ये 
समिती सदस्यांकडून इतरांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्यांची राहण्याची व्यवस्था एका हॉटेल केली जाणार आहे. समितीचे काम बुधवारपासून सुरू होईल, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. 

सात हजार जणांनी केली तीन वसाहतींमध्ये तपासणी 
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या समतानगर, आसेफिया कॉलनी आणि हिलाल कॉलनी या तीन नवीन वसाहतीतील सुमारे दीड हजार घरांचे सर्वेक्षण करून सात हजार ९२८ नागरिकांची महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी केली आहे. तसेच सध्या दहा वसाहतींत महापालिकेची आरोग्य पथके घरोघरी सर्व्हे करून नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. या दहा वसाहतींत १०३ पथकांनी सहा हजार ३० घरांचा सर्व्हे केला. त्यात २९ हजार २४८ नागरिकांची आरोग्य तपासणी केली. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad