हात धुवा निरोगी रहा... ही महापालिका वाटतेय घरोघरी साबण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले तिथे आता महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यासोबतच ‘हात धुवा, निरोगी रहा’ चा संदेश देत साबनाचेही वाटप करण्यात आले. ​

औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे शहरात गेल्या काही दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णांची संख्या ३८ वर पोचली आहे. नवनवीन भागात रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची काळजी वाढली आहे. ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले तिथे आता महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यासोबतच ‘हात धुवा, निरोगी रहा’ चा संदेश देत साबनाचेही वाटप करण्यात आले. 

शहरात कोरोनाची धास्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या जलाल कॉलनी, हिलाल कॉलनी, किराडपुरा, बायजीपुरा, समतानगर, आरेफ कॉलनी, यादवनगर, पडेगाव येथील कासलीवाल तारांगण वसाहतींमधील अनेकजण उपचार घेत आहेत. हा भाग महापालिकेतर्फे सील करण्यात आला असून, दररोज नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. या भागातील नागरिकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचा व सोबत साबन देण्याचा निर्णय महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतला होता. त्यानुसार बुधवारी (ता. २२) हिलाल कॉलनी येथील नागरिकांना हात निर्जंतुक करणासाठी महापौरांच्या हस्ते साबण वाटप करण्यात आले. महापालिकेला कोरोनाबाधित क्षेत्रामध्ये वाटप करण्यासाठी दीड हजार साबण देण्यात आले आहेत. त्यानुसार साबणाचे घरोघरी वाटप केले जात आहे. यावेळी माजी विरोधीपक्षनेचा जमीर कादरी, आतरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

५० कोटींच्या निधीची महापौरांची मागणी 
शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच असून, संसर्गजन्य आजारावर उपचार करण्यासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेचे २०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शासनाकडून निधी मिळाल्यास शहरातील एखाद्या आरक्षित भूखंडावर हे रुग्णालय उभारता येईल. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती किंवा विशेष बाब म्हणून राज्य शासनातर्फे आरोग्यसेवा बळकटी करणाअंतर्गत ५० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘त्या’ अपार्टमेंटमधील आणखी ४० जणांची होणार तपासणी 
समतानगरमधील आणखी दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकाच अपार्टमेंटमधील ४० जणांची आता आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. या सर्वांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. त्यानंतर त्यांना किलेअर्कमधील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात १४ दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाणार असल्याचे श्रीमती पाडळकर म्हणाले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad