रामकृष्ण उपसा सिंचन प्रकल्पाला कोरोनाचा अडथळा

प्रकाश बनकर
शनिवार, 4 एप्रिल 2020

रामकृष्ण गोदावरी संस्थेच्या माध्यमातून रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना वर्ष १९९४-९५ मध्ये सुरू झाली. ही योजना दोन वर्षे चालल्यानंतर बंद पडली. या योजनेसाठी जिल्हा बॅंकेने नाबार्डकडून कर्ज घेत शंभर कोटी रुपये भरत ही योजना आपल्या ताब्यात घेतली होती.

औरंगाबाद : जिल्हा बॅंकेच्या बहुचर्चित रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन प्रकल्पामागचे विघ्न दूर होताना दिसत नाही. या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले आहे. मागील वेळी अतिवृष्टीमुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते. आता पंप जोडण्याचे कामही झाले आहे. वीजजोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केला असून, जोडणी मिळाल्यावर याची टेस्टिंग होणार होती; मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे काम आणखी लांबणीवर पडले आहे. 

रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या माध्यमातून सरकारकडून पाच कोटी ९६ लाख रुपयांच्या निधीतून हे काम करण्यात आले. यासाठीचे टेंडर काढून नवीन यंत्रसामग्री आणण्यात आली; तसेच मोटरपंप बसविण्यात आले. दरम्यान, परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर प्रकल्पात पाणी आले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

यामुळे पाईप जॉइंटचे काम अडून पडले आहे. हे काम आता झाले आहे. आता वीजजोडणीसाठी महावितरणकडे २७ लाख रुपये जमा केले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर म्हणजेच एक ते दोन महिन्यानंतर यांची टेस्टिंग केली जाणार असल्याचेही जिल्हा बँकेतर्फे सांगण्यात आले आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

असा आहे प्रकल्प? 

रामकृष्ण गोदावरी संस्थेच्या माध्यमातून रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना वर्ष १९९४-९५ मध्ये सुरू झाली. ही योजना दोन वर्षे चालल्यानंतर बंद पडली. या योजनेसाठी जिल्हा बॅंकेने नाबार्डकडून कर्ज घेत शंभर कोटी रुपये भरत ही योजना आपल्या ताब्यात घेतली होती. त्यानंतर योजनेचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला. पाइपलाइन विकायला काढली, तर दोन ते तीन कोटींशिवाय जास्त पैसे येणार नाही, म्हणून बॅंकेने ही योजना सुरू करण्यासाठी पुन्हा पुढाकार घेतला.

पाटबंधारे विभागातर्फे पावणेसहा कोटी रुपये दुरुस्तीसाठी दिले. त्यानंतर सहकार कायद्यानुसार प्रक्रिया केली. यात बराचसा कालावधी लोटला गेला. पंप जुना झाला होता, त्यामुळे दुरुस्तीऐवजी नव्या पंपाची ऑर्डर देण्यात आली होती. त्यानंतर आता नवीन मशिनरी मागविण्यात आली. 

२५ ते ३० गावांना फायदा 
रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन प्रकल्पामुळे गंगापूर आणि वैजापुरातील २५ ते ३० गावांना फायदा होणार आहे. यासह दोन हजार हेक्‍टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येईल. यामुळे या योजनेचे महत्त्व ओळखून कामाला गती देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona obstruction to Ramakrishna upas irrigation project in Aurangabad