पाचोऱ्यात कोरोनाग्रस्ताचा मृत्यू : सोयगाव तालुक्यात खळबळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 एप्रिल 2020

सोयगाव तालुक्याची सर्वात कमी अंतराची सीमारेषा असलेल्या पाचोऱ्यात मंगळवारी एकाचा मृत्यू झाला. पण मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्याने शेजारच्याच सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद : सोयगाव तालुक्याची सर्वात कमी अंतराची सीमारेषा असलेल्या पाचोऱ्यात मंगळवारी एकाचा मृत्यू झाला. पण मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्याने शेजारच्याच सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पाचोरा तालुक्याच्या सीमारेषेवर सोयगावच्या ५२ गावांची हद्द ७ कि.मी अंतराची आहे. त्यामुळे निम्म्या तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यातच पाचोऱ्याला एकाचा मृत्यू झाल्याची बातमी सोयगाव तालुक्यात मंगळवारी धडकताच प्रशासनही खडबडून जागे झाले आणि नागरिकांचीही घाबरगुंडी उडाली आहे.

पैठण तालुक्यात पोलिसांवर दगडफेक, सामुदायिक प्रार्थनेला केला प्रतिबंध

सोयगाव शहर वगळता तालुक्याचा बनोटी, गोंदेगावपर्यंतचा भाग पाचोरयाला लागूनच आहे. त्यामुळे तालुका प्रशासन दक्ष झालेले असून, जळगाव जिल्ह्याच्या तपासणी नाक्यांवर तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पाचोऱ्याच्या कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूची बातमी गावात येताच काही गावांनी पाचोऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांना खोदकाम करून रस्ते पूर्णतः बंद पाडले आहे.

५२ गावांची चिंता वाढली

सोयगाव तालुक्यातील ५२ गावांचा पाचोऱ्याशी जवळचा संपर्क आहे. शेती, किराणा, व्यवसायातून पाचोऱ्याशी सोयगाव तालुक्यातील काही गावांची नाळ जोडली गेली आहे. परंतु पाचोऱ्यातील घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

सीमारेषेवरील गावातील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या असून पाचोऱ्याकडे न जाण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहे. या भागातून कोणीही नातेवाईक घरी आल्यास त्याची कोरोना तपासणी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

सोयगाव तालुक्यात अद्याप एकही संशयित कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र सोयगाव तालुका एकीकडे औरंगाबाद आणि दुसरीकडे जळगाव असा दोन रेड झोन जिल्ह्यांच्या चक्रव्यूहात अडकला असल्याने आता तालुका प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Patient Dead In Pachora Jalgaon Alert In Soygaon Aurangabad