CoronaVirus : अंगावर काटा येतो; पण निर्धार उभारी देतो 

अनिलकुमार जमधडे
Sunday, 3 May 2020

कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉ. शुभांगी आरबड यांच्या भावना 

औरंगाबाद : कोरोनाच्या वॉर्डमध्ये थेट रुग्णांशी येणारा संपर्क अंगावर काटा आणतो. केव्हाही कोरोनाची लागण होऊ शकते, याचे संपूर्ण भान आहे. असे असले तरीही डॉक्टरी पेशात प्रवेश करण्यापूर्वीच घेतलेली शपथ आठवून रुग्णसेवेत केव्हाच कमी पडणार नाही, हा निर्धार रोजच्या रुग्णसेवेसाठी उभारी देतो, अशी भावना औरंगाबादच्या रहिवासी तथा मुंबई येथील नायर व कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये कोरोना वॉर्डात रुग्णसेवा देत असलेल्या डॉ. शुभांगी भाऊसाहेब आरबड यांनी व्यक्त केली. 

कोरोना वॉर्डांत ड्युटी 

डॉ. शुभांगी यांचे वडील भाऊसाहेब आरबड हे दुबईमध्ये अभियंता आहेत. भाऊ शिक्षणासाठी अमेरिकेत आहे. आई मुंबईमध्ये आहे. आजी-आजोबा साष्ट पिंपळगाव (ता. अंबड) येथे तर इतर नातेवाईक औरंगाबादेत आहेत. डॉ. शुभांगी सध्या मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असल्याने पहिल्या दिवसापासून कोरोनाच्या वॉर्डांमध्ये ड्युटी करीत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

देशसेवेची भावना 

डॉ. शुभांगी यांनी सांगितले की, ‘‘लहानपणापासूनच देशासाठी काहीतरी करावे असा सतत मनात विचार होता. म्हणूनच दोन वेळा इंडियन आर्मीच्या सेवेसाठी प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. शेवटी डॉक्टरी पेशा निवडला. डॉक्टरी पेशामध्येही समाजसेवा करता येते याचा आनंद असल्याने अगदी मनापासून रुग्णसेवेसाठी वाहून घेतले. कोरोना वॉर्डांमध्ये काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 कौतुकाची थाप देते प्रेरणा 

शासनाचे नियम, उपलब्ध साधनसामग्री, विविध रुग्णांचे स्वभाव यातून मार्ग काढत काम करावे लागेत. ड्युटीचा काळ बारा तासांपेक्षा अधिकचा होतो; काळजीपोटी आई-वडील आणि कुटुंबीयांकडून सारखी फोनवरून होणारी विचारणा आणि कौतुकाची थाप कामासाठी प्रेरणा देते. त्यामुळेच कोरोना रुग्णांवर उपचार करताना कुठलीही भीती वाटत नाही. मात्र, प्रचंड काळजी घ्यावी लागते, पीपीई किट आणि स्वतःसाठी प्रोटेक्ट करणारे साधन वापरताना अंनकम्फर्ट अवस्थेमध्ये दहा ते बारा तास ड्युटी करावी लागते. हे अत्यंत जिकिरीचे आहे.’’ 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

रुग्णसेवा महत्त्वाची 

कोरोना ड्युटीमुळ सध्या दिवस कुठे निघतो आणि कुठे मावळतो हेही समजत नाही. कोरोनाचा लढा देणारा प्रत्येक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस व सर्व प्रशासकीय सेवेतील कर्मचारी कोरोनाशी चार हात करत असताना मात्र डॉक्टरांवर होणारे हल्ले, आरोप-प्रत्यारोप कुठेतरी मन खिन्न करतात, अशा परिस्थितीतही रुग्णांची सेवा महत्त्वाची म्हणून प्रत्येक डॉक्टर आपले योगदान देत आहेत. जगभरातील सर्व डॉक्टर शास्त्रज्ञ कोरोनाशी लढा देत आहेत. सगळ्यांच्या मदतीने कोरोनावर मात करण्याची लढाई नक्कीच यशस्वी होणार आहे. मात्र, त्यासाठी तुमची साथ हवी आहे, नागरिकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य होणार नाही,’’ असा विश्वासही डॉ. शुभांगी यांनी व्यक्त केला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Patients Ward Dr.Shubhangi Arbad Express Her Feelings