औरंगाबादेत कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा ९५ टक्क्यांवर

माधव इतबारे
Monday, 14 December 2020

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व दिवाळीच्या सणानंतर रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती.

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व दिवाळीच्या सणानंतर रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णांची संख्या घटत असल्याने कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा ९५ टक्क्यांच्या वर पोचले आहे.
कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी यंत्रणनेने केलेल्या उपाययोजनांमुळे ऑक्टोबर महिन्यात रुग्णांची संख्या कमी-कमी होत होती. पण दसरा-दिवाळी सणांत खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्यामुळे आठवडाभरातच रुग्णांची संख्या पुन्हा वाढली. ५० ते ६० वरून दीडशे ते पावणे दोनशेपर्यंत रुग्णांचा आकडा पोचला.

त्यानंतर दिल्लीसह चार राज्यातही कोरोना रुग्ण वाढले व दुसऱ्या लाटेची भिती शासनाने व्यक्त केली. त्यामुळे प्रशासनाने शहरात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी सुरू केली. त्यामुळे संसर्ग पुन्हा एकदा नियंत्रणात येत आहे. आठवडाभरापासून रुग्ण संख्येत घट होत असल्याने रिकव्हरी रेट वाढला असून, तो ९५.६६२ टक्क्यांवर पोचला आहे. तसेच जिल्ह्याचा मृत्युदर २.३ टक्के एवढा आहे. पण शहरातील मृत्युदर अद्यापही तीन टक्क्यांवरच आहे.

शहरातील कोरोनाचा मृत्युदर २.८९१ टक्के एवढा नोंदला गेला असल्याचे महापालिकेने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. रविवारी जिल्ह्यात नवे ६८ रूग्ण नव्याने आढळले तर १३१ जणांना सुटी देण्यात आली. आत्तापर्यंत जिल्ह्यात ४४,४३५ रूग्ण आढळले. त्यापैकी ४२,६४३ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच ११७३ जणांचा आजवर मृत्यू झाला असल्याचे देखील अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Recovery Rate Again On 95 Percent Aurangabad