कोरोनामुळे गावकरी माणुसकी विसरला, अन्...

संदीप लांडगे
Saturday, 23 May 2020

लॉकडाऊनमुळे आपापल्या गावाकडे जाता आले नाही. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काहींनी पास काढून गाव गाठले. मात्र गावाच्या वेशीवर दगड, काचा, काटेरी झुडपे तोडून रस्ते आडवण्यात आले 

औरंगाबाद ः शहरी भागाला कोरोनाचा विळखा पडला आहे. हे महामारीचे संकट आपल्याकडे नकोच... म्हणून प्रत्येक गावातील ग्रामस्थ सतर्क झाला आहे. हा सतर्कपणा कधी-कधी माणुसकीही विसरत आहे. शहरातून आलेला प्रत्येकजण कोरोनाग्रस्तच आहे, असा त्यांचा समज झाला आहे. 

कुटुंबांच्या ओढीपोटी अनेक अडथळे पार गावात गेलेल्या तरुणावर असाच बाका प्रसंग ओढवला. त्याला दोन दिवस शेतातील गोठ्यात काढावे लागले. त्यात अवकाळी झाला व गोठ्यावरची पत्रे उडून गेल्याने संपूर्ण रात्र तो पावसात भिजला. या अनुभवानंतर दोनच दिवसात शहरात परतलेल्या सुधीर शिंदे याने आपबीती सांगितली. 

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

सुधीर औरंगाबादेत एका खासगी बॅंकेत काम करत आहे. त्याचे मूळ गाव बीड जिल्ह्यात आहे. आईवडील लहानपणीच देवाघरी गेल्याने गावी भाऊ आणि त्याचे कुटुंब राहते. लॉकडाऊनमुळे त्याला आपल्या गावी जाता आले नव्हते. त्यामुळे गावाकडे जाऊन मित्र, नातेवाइकांना भेटण्याची ओढ लागल्याने लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल होताच मिळेल ते वाहन तर कधी पायी चालत त्याने गाव गाठले. अनेक अडचणीवर मात करून तो गावात पोचला, मात्र तिथेही समस्यांनी त्याची पाठ सोडली नाही. 

हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  

सुधीर ज्यावेळी गावी पोचला त्यावेळी मित्र, नातेवाईक त्याला पाहून दूर पळून गेले. गावकऱ्यांनीच त्याची रवानगी शेतातल्या गोठ्यात केली. उन्हाळ्यामुळे शेतात पाण्याची सोय होती ना जेवणाची. तू इथेच राहा, आवश्‍यक ते पुरवू असे नातेवाइकांनी सांगितले. पण, दोन दिवस तिकडे कोणी फिरकले सुद्धा नाही. 
गावात असा ‘पाहुणचार’ मिळाल्याने सुधीर परत शहरात आला व त्याने आपबीती सांगितली, ‘‘गावाकडे गोठ्यात रवानगी केल्यानंतर तेथील थोडीफार साफसफाई करून झोपण्यापुरती सोय केली. भुकेने पोटात कावळे ओरडत होते, वाटलं कोणीतरी जेवण घेऊन येईल, परंतु कोणीच आले नाही. रात्री नऊ वाजता अवकाळी पावसाने गारांसह हजेरी लावली. 

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान    

वादळी वाऱ्यामुळे गोठ्याचे पत्रे उडून गेले. त्यामुळे पूर्णरात्र शेतातील चिखलात भिजून आणि जागरण करत काढली. दुसऱ्या दिवशीही सकाळी अकरा वाजेपर्यंत कोणीही शेतात आले नाही. त्यावेळी मनात विचार आले की, खरंच गावाकडील लोकांचे विचारांची पातळी एवढी घसरली आहे का? माणुसकी शिल्लक नसल्यासारखे का वागत आहेत. लगेच बॅग भरून औरंगाबादला जाण्याचा निर्णय घेतला. पंधरा किलोमीटर चालत गेवराईला गाठले, तेथून मित्राला फोन केला. मित्र गाडी घेऊन लगेच आला व पुढे घर गाठले. 

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   

पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक जण मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध शहरात स्थायिक झाले. मात्र अनेकांची नाळ आजही गावाशी जोडलीली आहे. शहरात कोरोनाचा कहर असताना गावाकडे असलेल्या आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना त्रास होऊ नये, असे त्यांना वाटते. अनेकांना लॉकडाऊनमुळे आपापल्या गावाकडे जाता आले नाही. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काहींनी पास काढून गाव गाठले. मात्र गावाच्या वेशीवर दगड, काचा, काटेरी झुडपे तोडून रस्ते आडवण्यात आले आहेत. 

गावाकडे गेल्यानंतर ग्रामस्थांकडून मिळणाऱ्या वागणुकीचे कुठे चांगले तर कुठे अत्यंत वाईट अनेक मिळत आहेत. शहरातून गावाकडे गेलेल्यांना घाबरून गावकरी मित्र धूम ठोकत आहे तर काही मित्र, नातेवाईक पाहून न पाहिल्यासारखे करत दूर जात आहेत. काहींना नातेवाईक घरात घेत नाहीत तर काही गावाकडे का आलात? अशी विचारणा करत आहेत. काही ठिकणी तोडगा म्हणून गावातील प्रतिष्ठित व्यक्ती शेतात राहाण्याची सूचना करत आहेत. शेतातच चौदा दिवसाचा क्वारंटाईन कालावधी संपला तरी त्यांना गावात घ्यायला लोक धजावत नसल्याचे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Updates The Story of a Young Man Who Went to The Village Due to a Lockdown Aurangabad