
घाटी रुग्णालयासह सामान्य रुग्णालयांतर्गत जिल्ह्यातील चार उपजिल्हा केंद्रांत तसेच शहरातील पाच केंद्रात अशा दहा केंद्रावर लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली.
औरंगाबाद : जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम देशात सुरु झाली आहे. कोरोनाविरोधीच्या यज्ञात ‘लसस्वी भवं’ला तंत्रदोष लागल्याने लसीकरण मोहिम पहिल्याच दिवशी संथावली. शनिवारी (ता. १६) लसीकरण मोहिम सुरु झाली खरी; पण लसीकरणाची संपर्कनाडी ‘कोव्हीन ॲप’वर एकाचवेळी भार आल्याने ते ब्लॉक झाले. त्यामुळे ॲपमध्ये वारंवार बिघाड होऊन अनेकांना मेसेज आले नाहीत.
घाटी रुग्णालयासह सामान्य रुग्णालयांतर्गत जिल्ह्यातील चार उपजिल्हा केंद्रांत तसेच शहरातील पाच केंद्रात अशा दहा केंद्रावर लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. एका केंद्रावर प्रत्येकी शंभर असे एक हजार जणांचे आज लसीकरण करण्याचे ठरले होते.
मात्र लसीकरणासाठी ‘कोव्हीन ॲप’मध्ये नोंदणी केल्यानंतरच लाभार्थ्याला लसीकरणाचा लाभ मिळणार होता. शनिवारी लसीकरण पार पडताना तांत्रिक दोष झाले, ॲपमध्ये वारंवार बिघाड झाल्याने लसीकरण मोहिमेवर प्रभाव जाणवला. प्रत्यक्षात १ हजार पैकी ६३८ जणांचेच लसीकरण करण्यात आले. ही टक्केवारी ६३. ८ टक्के एवढी आहे.
ग्रामीणमध्ये २१२ जणांचे लसीकरण
जिल्ह्यात आज ४०० जणांना लस टोचण्यात येणार होती. तसे नियोजनही झाले परंतू. फक्त २१२ जणांनाच लस टोचता आली.
ॲपच्या तांत्रिक बिघाडामुळे हे झाले असून ही टक्केवारी ५३ टक्के होती.
येथे झाले लसीकरण
घाटी रुग्णालय : ७४
वैजापूर : ३३
सिल्लोड : ७९
अजिंठा : ५४
पाचोड : ४६
महापालिका :४२६
-------
एकूण : ६३८
-----
‘‘कोव्हीन ॲपवर देशातील पहिल्या टप्प्यातील सर्व लाभार्थ्यांची नोंदणी आहे. ‘कोव्हीन ॲप’ पूर्णपणे ब्लॉक झाले होते. ॲप संथ झाल्याने अनेकांना मेसेज आले नाही. पण नोंदणी झालेल्यांची सर्व प्रक्रीया ‘ऑफलाईन’ करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. त्यानंतर आम्ही सर्व योद्ध्यांना संपर्क साधून लसीकरण करुन घेतले.’’
-सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा
घाटी रुग्णालयात ७४ जणांना लाभ
लसीकरणाला आज प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी शंभर जणांना लस दिली जाणार होती. प्रत्यक्षात मात्र ७४ जणांनाच लस टोचण्यात आली. यात ३२ डॉक्टर्स, डॉक्टरशिवाय ४२ आरोग्यसेवकांचा समावेश होता. ७४ पैकी १७ महिला व ५७ पुरुष होते. अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. लस घेतलेल्यांत अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. एल. एस. देशमुख, डॉ. प्रसाद देशपांडे, डॉ. अविनाश लांब आदींचा समावेश होता.