esakal | CoronaVirus : बापरे...! कोरोनाचा खासगी खर्च तीन लाखांपर्यंत 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

सर्वसामान्य रूग्णांसाठी पीपीई किट

अन् हॉस्पीटल चार्जेस आवाक्याबाहेर 

CoronaVirus : बापरे...! कोरोनाचा खासगी खर्च तीन लाखांपर्यंत 

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णावर सध्यातरी सरकारी पातळीवर खर्च केला जात आहे. शहरात दोन खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय करण्यात आली आहे. मात्र, खासगी रुग्णालयाचा हा खर्च तीन ते पाच लाखांपर्यत जात आहे. त्यामुळे सध्यातरी हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. 

दोन रूग्णालयांत सोय 

कोरोनाच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असली तरीही औरंगाबाद शहरात दररोज प्रचंड वेगाने आकडे वाढत आहेत. त्यामुळेच लवकरच सरकारी यंत्रणा कमी पडते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. यानुषंगाने ज्यांना सरकारी सेवा नको आहे, अशा लोकांना खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतात. मात्र, यासाठी भविष्यात प्रशासनाने अधिकाधिक खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्याची गरज आहे. सध्यातरी औरंगाबाद शहरात धूत हॉस्पिटल आणि एमजीएम हॉस्पिटल अशा दोन खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचाराची सोय आहे. असे असले तरीही हा खर्च प्रचंड आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनाबाधिताच्या खर्चाचे ‘खासगी’ गणित 

कोरोनाबाधित सामान्य व्यक्तींना खासगी रुग्णालयात खर्च परवडणारा नाही, सर्वसाधारण एका रुग्णाचा दररोजचा खर्च दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला निगराणीखाली ठेवावे लागते. प्रत्येक रुग्णांच्या भोवती दोन वेळा व्हिजीट करणारे दोन डॉक्टर आणि नर्स, वॉर्ड बॉय, स्विपर, मावशी असा किमान चार ते पाच जणांचा स्टाफ ठेवावा लागतो. या प्रत्येकाला पीपीई कीटची आवश्यकता असते. एक किट एकदाच वापरता येते. यातील काहींना एक किट दोन किंवा तीन वेळाही बदलावी लागते. साधारण दीड हजार रुपये एका पीपीई किटची किंमत आहे. त्यामुळे किटचाच एका दिवसाचा खर्च आठ ते दहा हजारांच्या जवळपास जातो. शिवाय रुग्णाचे रूमभाडे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत आहे. त्यानंतर नर्सिंग चार्जेस, डॉक्टर चार्जेस असा वेगळा खर्च त्यात समाविष्ट होतो. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

...तर दुपटीने वाढ 

एखाद्या रुग्णाला व्हेन्टीलेटरची गरज पडलीच तर पाच हजार रुपये रोज वेगळा सुरू होतो. त्यातच रुग्णाला रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, किडणीचे आजार किंवा अन्य काही आजार असेल तर हा खर्च आणखी दोन ते तीन पटीने वाढतो. पॉजिटीव्ह रुग्ण ठणठणीत असला तरीही त्याला चौदा दिवस निगराणीत ठेवावेच लागते. त्यामुळे एका रुग्णाचा हा खर्च तीन लाख किंवा त्यापेक्षा अधिक होतो. कोरोना रुग्णाचे सध्या आकडे वाढत असल्यानेच सामान्य व्यक्तींमध्ये खासगी रुग्णालयाच्या खर्चाबद्दल कुतूहल आहे. परंतु, सध्यातरी कोरोनाचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आरोग्य विम्याचा संभ्रम 

कोरोना संसर्ग हेल्थ इन्शुरन्समध्ये कव्हर होतो किंवा नाही याबद्दलही संभ्रमावस्था आहे. मुळात कोरोना हा आजारच नव्याने असल्यामुळे कुठल्याही पॉलिसीत तो समाविष्ट नाही. मात्र असे असले तरीही कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून अनेक इन्शुरन्स कंपन्यांनी कोरोनासाठी इन्शुरन्स देण्याची तयारी दर्शविली आहे. काही कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून तसे कळवलेही आहे. असे झाले तर हेल्थ इन्शुरन्स असलेल्या रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.