CoronaVirus : कोरोनाने घेतला बळी, पण घाटी म्हणते, सुटीवर होता त्यावेळी!

अनिलकुमार जमधडे
Monday, 22 June 2020

घाटी प्रशासनाच्या संवेदना हरवल्या 

औरंगाबाद ः घाटी रुग्णालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनामुळे दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरीही प्रशासन एकच मृत्यू झाल्याचे सांगत आहे. पूर्वी मृत्यू झालेला दंत रुग्णालयाचा कर्मचारी हा कोरोना झाला त्यावेळी सुटीवर होता, असे असंवेदनशील उत्तर घाटी प्रशासनाने दिले आहे. त्यावर संताप व्यक्त होत आहे. 

शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळेच कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मात्र घाटी रुग्णालयामध्ये फारशी काळजी घेतली जात नाही.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

बाहेरून कोरोना झाल्याचा संबंध

कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना पुरेशा साधनसामग्रीबरोबरच त्यांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. असे असताना प्रशासन कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी बाहेरून कोरोना झाल्याचा संबंध लावत आहे. यापूर्वी मृत्यू झालेल्या दंत रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याबाबत त्याला कोरोना झाला त्यावेळी तो कर्मचारी सुटीवर होता, असे वैद्यकीय अधीक्षक सुरेश हरबडे यांनी सांगितले आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तो कर्मचारी सुटीवर होता

मुळात घाटी रुग्णालयाच्या आवारात काम करणारा कर्मचारी आहे, हे सत्य स्वीकारण्याऐवजी तो कर्मचारी सुटीवर होता, त्याला तिकडेच कोरोना झाला, असे म्हणणे संवेदनशून्यता आहे. घाटी रुग्णालयाच्या आवारात कुठेही काम करणारा कर्मचारी असो, त्याला मास्क, हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर दिलेच पाहिजे. असे असतानाही कोरोना वॉर्डात काम करत असेल तर त्याला हॅण्डग्लोव्हज, मास्क दिले जातात, असे प्रशासन सांगत आहे. म्हणजेच कोरोना वॉर्डाबाहेर काम करणारे असतील तर त्यांची काळजी घेण्याची गरज वाटत नाही. त्यामुळेच घाटी रुग्णालयाच्या परिसरात काम करणारे कर्मचारी हे विनामास्क, हॅण्डग्लोव्हजशिवाय काम करताना दिसत आहेत. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

असाही गलथानपणा 

घाटी रुग्णालयाला शासनाच्या पुरवठ्याशिवाय विविध स्वयंसेवी संस्था-संघटनांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर मास्क, पीपीई किट, सॅनिटायझर दिले आहे. पुरेसा साठा असतानाही साहित्याचे योग्य वाटप केले जात नाही, हा प्रशासनाचा गलथानपणाच आहे. घाटी रुग्णालयात अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी पदाला चिकटून बसलेले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीमुळे त्यांच्या बदल्या तर सोडाच परंतु अंतर्गत कामही बदलत नाही. कामाचे रोटेशन होत नाही. परिणामी ठराविक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असतो. याबद्दल संबंधित कर्मचारी वारंवार तक्रारी करतात, मात्र त्याकडेही प्रशासन लक्षही देत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Infected Covid, Ghati Administration Insesitive