शाळा संचमान्यतेसाठी आधारकार्ड अपडेटला ही मोठी अडचण... 

संदीप लांडगे
Friday, 5 June 2020

सद्यःस्थितीत कोरोनामुळे विद्यार्थी आधार कार्ड द्यायला शाळेत येऊ शकत नाहीत. शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. अनुदानित शाळेच्या संचमान्यता व शिक्षक पदसंख्या ही विद्यार्थीसंख्येनुसार निश्चित होते.

औरंगाबाद ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व शाळा बंद असताना शालेय शिक्षण विभागाने मागच्या वर्षीसह यावर्षीची संचमान्यता करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट केल्याशिवाय शाळांची संचमान्यता होणार नसल्याची अट घालण्यात आली आहे. परंतु कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट कसे करावे? तसेच अनेक शिक्षक कोरोनाच्या ड्युटीवर असल्यामुळे या कामासाठी कधी वेळ काढावा? असे अनेक प्रश्‍न शाळा आणि शिक्षकांकडून उपस्थित केले जात आहेत. 

२०१९-२० यावर्षीची संचमान्यता करण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले होते. मात्र, सरकार बदलानंतर आता या निर्णयात बदल करण्यात आला. यामध्ये २०१९-२० व २०२०-२१ या काळातील संचमान्यता करण्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आले आहेत. आधार कार्ड अपडेटशिवाय दोन्ही वर्षांची संचमान्यता होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनामुळे अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत शिकणारी मुले आपापल्या जिल्ह्यात, राज्यात निघून गेली आहेत. 

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

तसेच गेल्या वर्षी जे विद्यार्थी शाळेत होते, ते आता इतर ठिकाणी गेले आहेत, त्यांची संचमान्यता कशी करावी, असा प्रश्‍न शिक्षकांसमोर आहे. औरंगाबाद विभागातील जालना, बीड, औरंगाबाद, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील ५० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट केलेले आहेत. तर ५० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट केलेले नाहीत. औरंगाबाद विभागात एकूण २६ लाख १४ हजार ६९३ विद्यार्थी आहेत. त्यापैकी १३ लाख २३ हजार ३२३ विद्यार्थ्यांचे आधार अपडेट आहेत, तर १२ लाख ९१ हजार ३७० आधार कार्ड अपडेट करणे बाकी आहे. 

हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  

सक्ती योग्य आहे का? 
विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे संचमान्यतेसाठी लागेल, अशा सूचना वर्षाच्या सुरवातीला शिक्षण विभागाकडून दिल्या होत्या. परंतु सद्यःस्थितीत कोरोनामुळे विद्यार्थी आधार कार्ड द्यायला शाळेत येऊ शकत नाहीत. शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. अनुदानित शाळेच्या संचमान्यता व शिक्षक पदसंख्या ही विद्यार्थीसंख्येनुसार निश्चित होते. जर आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार संचमान्यता निश्चित होणार असेल; तर आधार नसलेले विद्यार्थी शाळाबाह्य ठरले तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न शाळांकडून उपस्थित केला जात आहे. त्याची सक्ती नको, असेही शिक्षकांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान

 
जिल्हानिहाय आकडेवारी 

जिल्हा एकूण विद्यार्थी आधारकार्ड अपडेट अपडेट बाकी
औरंगाबाद ९,४७,७२१ ३,६१,६९८ ५,८५,४२३
बीड ५,८९,६८९ २,६७,२१७ ३,२२,४७२
हिंगोली २,३५,४७९ १,२३,७६३ १,११,७१६
जालना ४,३६,४५२ ३,०२,१८७ १,३४,२६५ 
परभणी ४,०५,९५२ २,६८,४५८ १,३७,४९४

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Updates Difficulties for Schools to Update Aadhaar Card Aurangabad