धक्कादायक! ऑनलाइन शिक्षणाच्या ग्रुपवरच अश्‍लील व्हिडिओ 

संदीप लांडगे
Tuesday, 23 June 2020

ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर शाळांकडून विद्यार्थ्यांना आभ्यास दिला जातो. त्याच ग्रुपवर पालकाकडून अश्लिल व्हिडीओ, फोटो टाकल्यामुळे बाल मनावर काय परीणाम होईल?

औरंगाबाद ः कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. या ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम वारंवार समोर येत आहेत. असाच एक दुष्परिणाम औरंगाबादेत समोर आला आहे. शाळेकडून ऑनलाइन शिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर पालकानेच अश्लील व्हिडिओ, फोटो टाकल्याची घटना घडली. मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या या ग्रुपवर असे व्हिडीओ, फोटो टाकल्याने बालमनावर काय परीणाम होईल? याबाबत इतर पालक व शाळेतील शिक्षकांनी रोष व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवावे, असे शासनाने सुचवले आहे. त्यासाठी जिल्हास्तरावरील सर्व शाळांच्या माध्यमातून पालकांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या व्हॉट्सॲप ग्रुपवर विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जातो. हे ग्रुप विद्यार्थी सतत तपासून पहातात. त्यावरील व्हिडीओ, फोटो डाऊनलोड करतात. शहरातील एका शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एका पालकाने चक्क अश्‍लील व्हिडिओ, फोटो टाकल्याचा प्रकार घडला. व्हिडिओ, फोटो टाकल्यानंतर मोबाईल बंद करून ठेवण्यात आला. हा प्रकार इतर पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मुख्याध्यापक, शिक्षकांना याबाबत माहिती देऊन खरीखोटी सुनावली.

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

 या व्हिडिओ, फोटोचा जाब विचारण्यासाठी व तो व्हिडिओ तातडीने डिलीट करावा म्हणून मुख्याध्यापकांनी पालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधित पालकाने फोन बंद करून ठेवला होता. त्यामुळे मुख्याध्यापकाने प्रत्यक्ष त्या पालकाच्या घरी जाऊन फोटो व व्हिडिओ डिलीट केले. मुख्याध्यापकाने याबाबत पालकाला जाब विचारला असता पालकाने तो अश्‍लील व्हिडिओ व फोटो त्यांच्या मोठ्या मुलानेच टाकल्याचे समोर आले. तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे त्याला तो डिलीट करता आला नाही. त्यामुळे त्याने फोन बंद करून ठेवल्याचे संबंधित पालकाने मुख्याध्यापकाला सांगितले. याबाबत मुख्याध्यापकाने रीतसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....

इतर पालकांनाही त्रास 
ऑनलाइन शिक्षणासाठी सर्वच शाळांनी इयत्तानिहाय व्हॉट्सॲप ग्रुप बनवले आहेत. या व्हॉट्सॲप ग्रुपमुळे अनेकांचे मोबाईल नंबर शेअर झालेले आहेत. परिणामी, अनेक अनोळखी नंबरवरून महिला शिक्षिका, पालकांना विनाकारणचे मेसेजेस, फोटो येण्यास सुरवात झाली आहे. या नंबरवर संपर्क साधला असता ते शाळेतील पालकांचेच असल्याचे निदर्शनास आल्याचे समोर आले आहे. 

 

सर्व शिक्षकांनी व्हॉट्सॲप ग्रुपची तत्काळ सेटिंग बदलून ओन्ली ॲडमिन अशी करावी. विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास ग्रुपवर न मागवता खासगी व्हॉट्सॲपवर मागवून घ्यावा. पालकांनीही इतर कोणतेही व्हिडिओ, फोटो ऑनलाइन शिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या ग्रुपवर टाकू नयेत. 
- संजीव सोनार, मुख्याध्यापक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Updates Dirty Videos, Photos on Online Education Group Aurangabad