यंदा सजलीच नाही शैक्षणिक बाजारपेठ

संदीप लांडगे
Wednesday, 3 June 2020

औरंगाबादेत सुमारे दोन ते अडीच हजार पुस्तक आणि शालेय साहित्य विक्रीची दुकाने आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआगोदर काही दिवस ही सर्व दुकाने विद्यार्थी व पालकांच्या गर्दीने फुलून जातात. मात्र, सध्यातरी लॉकडाउन असल्यामुळे ही दुकाने बंद असल्याने पालक व विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे

औरंगाबाद ः दरवर्षी १५ जूनला सुरू होणारे शैक्षणिक वर्ष यंदा लॉकडाउनमुळे लांबले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा कधी सुरू कराव्यात, याबाबत शासनाकडून विचारमंथन सुरू आहे. शाळा सुरू होण्याआगोदर शहरातील सर्व बाजारपेठेत शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांची झुंबड उडते; परंतु अडीच महिन्यांपासून लॉकडाउन असल्यामुळे सर्वकाही ठप्प आहे. त्यामुळे शाळेसाठी बाजारपेठ सजलीच नाही. मात्र, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर खरेदीसाठी झुबंड उडणार हे निश्चित आहे. 

दरवर्षी शाळा सुरू होण्याआधी पालकांसोबत बच्चेकंपनीही खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. आपल्या आवडीची विविध कार्टूनची स्कूलबॅग, कंपास, शूज, शाळेचा गणवेश, वह्या खरेदी करतात. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून देशभरात लॉकडाउन आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच सुट्या देण्यात आल्या होत्या. इयत्ता दहावीचा भूगोलचा पेपरदेखील रद्द करण्यात आला होता. कोरोनामुळे मुले स्वतःच्या घरातच बंदिस्त झाले होते. ना मामाचा गाव, ना समर कॅम्प, सुटीत मॉलमध्ये फिरणे नाही, खेळणे नाही. यामुळे मुलांची संपूर्ण सुटी घरातील चार भींतीच्या आतमध्ये गेली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
औरंगाबादेत सुमारे दोन ते अडीच हजार पुस्तक आणि शालेय साहित्य विक्रीची दुकाने आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआगोदर काही दिवस ही सर्व दुकाने विद्यार्थी व पालकांच्या गर्दीने फुलून जातात. मात्र, सध्यातरी लॉकडाउन असल्यामुळे ही दुकाने बंद असल्याने पालक व विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. 

झुंबड उडणार 
लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पुस्तक आणि शालेय साहित्य खरेदीसाठी सर्वच दुकानात गर्दी होणार आहे. अशा वेळी डिस्टन्स आणि मास्कबाबत सर्वांनाच दक्षता घ्यावी लागेल. अशावेळी ग्राहकांच्या रांगा लागल्यास त्यांना सावली तसेच पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. दरवर्षी विद्यार्थी कंपास, स्कूलबॅग, वह्या, पाठ्यपुस्तके, छत्री, चित्रकला वही, रंगपेटी असे साहित्य लागते; मात्र यंदापासून या शालेय साहित्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क व सॅनिटायझर या दोन वस्तूंची भर पडली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशावर भार वाढणार आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शाळा कधी सुरु होणार याबाबत अस्पष्टता आहे. तसेच लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यानंतर दुकाने सुरु करण्यात येतील. नवीन वह्या, पाठ्यपुस्तकांचा  स्टॉक आलेला आहे. लवकरच खरेदीसाठी पालकांची गर्दी होईल. 
 - सुंदरलाल कर्नावट (विक्रेते ) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Updates Stationery market closed this year Aurangabad