
केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार लसीकरण कामात कुठल्या त्रुटी राहू नये याची खबरदारी घेण्यात आली. मात्र प्रत्यक्ष लसीकरणाला सुरवात होताच यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
औरंगाबाद : कोरोना लसीकरणासाठी वारंवार रंगीत तालीम घेण्यात आल्या. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार लसीकरण कामात कुठल्या त्रुटी राहू नये याची खबरदारी घेण्यात आली. मात्र प्रत्यक्ष लसीकरणाला सुरवात होताच यंत्रणा कुचकामी ठरत आहे. लसीकरणासाठी कोणाची निवड झाली याचे मेसेज पाठविण्याकरिता केंद्र सरकारने कोविन अॅप तयार केले. पण हे ॲप वारंवार हॅंग होत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी हातोहात निरोप देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली. मंगळवारी (ता. १९) दिवसभरात शहरात फक्त २७२ जणांना लस देण्यात आली.
शेतकऱ्याच्या आयटी इंजिनिअर मुलीची ग्रामपंचायतीत ऐटीत एन्ट्री, मतदारांनी केले भरघोस मतदान
कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्राप्त झालेल्या लसींचा पहिला डोस शनिवारी (ता. १६) देण्यात आला. त्यासाठी कोविन अॅपव्दारे आरोग्य कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आले. मात्र पहिल्याच मोहिमेला कोविन अॅप बंद पडल्याचे विघ्न आले. त्यामुळे शनिवारी आरोग्य विभागाची तारांबळ उडाली. काहींना निरोप मिळाले नाहीत. म्हणून मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतरही अॅप बंदच राहिल्याने रविवार, सोमवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले. दरम्यान ॲप सुरू करण्यासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून एक पथक नियुक्त करण्यात आले. या पथकाला देखील अॅपमधील तांत्रिक दोष दूर करता आले नाहीत. मंगळवारच्या लसीकरणासाठी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना हातोहाती निरोप पाठवून लसीकरणासाठी रुग्णालयात हजर राहण्याची सूचना केली.
‘आशां’नी दिला नकार
दोन आशा स्वंयसेविकांनी लस घेण्यास नकार दिल्याचा प्रकार घडला. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्या लस घेतील पण त्या नकारावर ठाम राहिल्या तर लस दिली जाणार नाही, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.
पुन्हा अत्यल्प प्रतिसाद
आजच्या लसीकरणासाठी ५०० जणांची निवड करून त्यांना निरोप देण्यात आले. पण दिवसभरात २७२ जणांनी लस घेतली. धूत हॉस्पिटलमध्ये ६६, बजाजमध्ये ४०, एमजीएम ५३, हेडगेवार ५९, मेडीकव्हर येथे ५४ जणांचे लसीकरण झाले.
घरात घुसून मुलाला बेदम मारहाण, आईला नीट समजावून सांग नाही तर खल्लास करु असे म्हणत मारेकरी पसार
मेडीकव्हरमध्ये दोघांना त्रास
मेडीकव्हर हॉस्पीटलच्या केंद्रात मंगळवारी ५४ जणांना कोरोना लस देण्यात आली. त्यापैकी दोघांना किरकोळ त्रास झाला. एकाला उलटी झाली तर दुसऱ्या एकाला चक्कर आली. दोघांनाही थोडा वेळ हॉस्पीटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले, त्यानंतर त्रास कमी झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आल्याचे डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.
कोविन अॅप वारंवार हँग होत असल्याने निरोप पाठविण्यास अडचणी येत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी लाभार्थींची यादी तयार करून त्यांना निरोप दिले जात आहेत. खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या रुग्णालयामार्फत निरोप पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी ५०० जणांना निरोप देण्यात आली आहेत.
-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी महापालिका.
Edited - Ganesh Pitekar