शेतकऱ्याच्या आयटी इंजिनिअर मुलीची ग्रामपंचायतीत ऐटीत एन्ट्री, मतदारांनी केले भरघोस मतदान

प्रशांत शेटे 
Tuesday, 19 January 2021

वडिलांनी शेतीत काम करीत शिक्षणासाठी पैसे पुरविले. यामुळे शिक्षणानंतर नोकरी करावी अशी तिची इच्छा होती.

चाकुर (जि.लातूर) : उच्चशिक्षित व्यक्ती राजकारणापासून अलिप्त राहत असल्यामुळे नवीन नेतृत्व निर्माण होण्यास अडथळा येत आहेत. मात्र असे असताना   कबनसांगवी (ता.चाकूर) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मात्र आयटी क्षेत्रात अभियंता असलेल्या २२ वर्षीय मुलींने दमदार एन्ट्री केली आहे. तिचे स्वतःचे पहिले मतदान स्वतःसाठी टाकून विजय मिळविला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांत कमी वयाची उच्चशिक्षित ग्रामपंचायत सदस्य ती ठरली आहे. 

आपची महाराष्ट्रात एन्ट्री; लातूरच्या दापक्याळमध्ये मिळविली सत्ता, अरविंद केजरीवालांनी मराठीत दिल्या शुभेच्छा

कबनसांगवी ग्रामपंचायतीच्या नऊ जागेसाठी निवडणूक लागल्यानंतर प्रभाग एकमधील अनुसुचित जाती महिलेच्या जागेसाठी पॅनल प्रमुखाकडून उमेदवाराचा शोध घेतला जात होता. माजी पंचायत समिती सदस्य राजकुमार राजारुपे यांनी उच्च शिक्षित असलेल्या संध्याराणी गौतम सोनकांबळे हीस निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. संध्याराणीचे बारावीपर्यंतचे शिक्षण गावातील शाळेत झाले असून तिने कोल्हापुर येथून आयटीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण नुकतेच घेतले आहे.

बेरोजगारांच्या खिशातून केली पोस्टाने तीस कोटींची कमाई!पदभरतीच्या नावाखाली तिजोरी भरण्याचे काम

वडिलांनी शेतीत काम करीत शिक्षणासाठी पैसे पुरविले. यामुळे शिक्षणानंतर नोकरी करावी अशी तिची इच्छा होती. शिक्षण संपताच गावाकडे आल्यानंतर तिला निवडणूक लढविण्यासाठी झालेल्या आग्रहामुळे तिच्या समोर पेच निर्माण झाला होता. गावातील प्रस्थापित नेत्याच्या राजकारणामुळे प्रभागातील समस्या तशाच होत्या. वर्षांनुवर्षे त्या सोडविण्याचा कोणीही प्रयत्न करीत नव्हते. आपल्या समस्यांची जाण असलेला उमेदवार येथील लोक शोधत असल्याचे मला लक्षात आल्यानंतर तिने निवडणूक लढण्याचा निर्धार केला.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

निवडणुकीसाठी स्वतः नामनिर्दशनपत्र भरले व प्रचाराला सुरूवात केली. प्रभागातील प्रत्येक व्यक्तींची भेट घेऊन गावासाठी आपण काय करू शकतो हे समजावून सांगितलं व मतदान करण्याची विनंती केली. मतदारांनी तिच्यावर विश्वास ठेवत भरघोस मतदान केले. यात तिने विजय मिळविला आहे. तिच्या विजयामुळे गावातील मतदारांसह तिच्या आईवडिलांना आनंद झाला असून गावासाठी तीने काहीतरी करावी अशी अपेक्षा तिच्याकडून व्यक्त केली जात आहे. 

महिलांना नेहमी एका विशिष्ट पिंजऱ्यात उभ केल जाते मग ते प्रतिमांच्या, अपेक्षांच्या, नैतिक बंधनाच्या आणि सुशिक्षित असेल तर मात्र हुंडा वाचवेल असा रुढार्थ आहे. राजकारण हे एक मोठ्ठं क्षेत्र आहे. यात पैसा खूप लागतो. यामुळे उच्चशिक्षण तरूण याकडे कानाडोळा करीत आहेत. महिलांचा राजकारणात तसा शिरकाव कमी पण महिला कोणतीही संधी यशस्वीपणे पेलू शकतात. हे सुप्रिया सुळे, निर्मला सीतारामन यांच्याकडे पाहून वाटते. मी ज्या प्रभागात उभी राहिले त्या ठिकाणी मी लहानाची मोठ्ठी झाले, इथूनच उच्च शिक्षणाचे स्वप्नं पाहिले. पण इथल्या प्रस्थापित नेत्यांच्या राजकारणामुळे प्रभागातील समस्या सुटत नव्हत्या. मी इथल्या परिस्थितीचे अवलोकन केलं, याठिकाणी लोकांच्या जागृतीचे थोडे काम केले आणि तरुणाईचा कल समजून घेतला. त्यात मला समजून आलं की या ठिकाणी वंचित असलेले लोकं खऱ्याखुऱ्या आणि आपल्या समस्यांची जाण असणारा उमेदवार शोधत आहेत. म्हणून मी निवडणूक लढण्याचा निर्धार केला. राजकारणात मी नवखी, एवढी नवखी की माझ मतदान सुद्धा पहिलं आहे आणि त्यातच मी उमेदवार म्हणून स्वतःला मतदान केलं व चांगल्या मतांनी निवडून ही आले. आता माझ्या निवडून येण्याबरोबर अपेक्षा आणि प्रश्न हे दोन्ही माझ्या समोर आहेत. पण मला ज्यांनी निवडून दिले त्यांची प्रेरणाच हे सगळं पेलण्याची ताकद मला देईल आणि माझ्या शिक्षणाचा उपयोग मी माझ्या स्वतःच्या गावासाठी करेन. 
-  संध्याराणी सोनकांबळे,  नूतन ग्रामपंचायत सदस्य, कबनसांगवी
 

 

Edited - Ganesh Pitekar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IT Engineer Girl Win Gram Panchayat Election Latur Lates News