रात्री कुणाला लिफ्ट देऊ नका, नाहीतर... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

लिफ्टचा बहाणा करून दुचाकीस्वाराला थांबवत चौघांनी बेल्टने मारहाण केली. त्यानंतर हत्याराने बोट तोडून महागडा मोबाइल व साडेचारशे रुपयांची रक्कम लांबविली. हा प्रकार २९ फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास कारगील मैदानात घडला.

औरंगाबाद : लिफ्टचा बहाणा करून दुचाकीस्वाराला थांबवत चौघांनी बेल्टने मारहाण केली. त्यानंतर हत्याराने बोट तोडून महागडा मोबाइल व साडेचारशे रुपयांची रक्कम लांबविली. हा प्रकार २९ फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास कारगील मैदानात घडला.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, विकास प्रकाश भारखड (२३, रा. जयभवानीनगर) हा दुचाकीने जात होता. त्याला एकाने लिफ्ट मागितली. त्यामुळे विकासने दुचाकी थांबवली. यावेळात आणखी तिघे तेथे आले. त्यांनी विकासला दुचाकीवरून खाली ओढत कारगील मैदानात अंधारात नेले. तेथे बेल्टने मारहाण केल्यानंतर यातील एकाने हत्याराने त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला इजा केली.

यानंतर चौघांनी त्याचा १९ हजारांचा मोबाईल व खिशातील साडेचारशे रुपये लांबविले. याप्रकरणी सात मार्चला सायंकाळी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत. 

चार संशयित ताब्यात 

औरंगाबाद : सिडको भागात संशयितरीत्या फिरणाऱ्या चौघांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. सहा) मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास सिडको एन-सात भागातील कुलस्वामिनी मंगल कार्यालयाजवळून ताब्यात घेतले. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार रोहित गणेश अंभोरे, रोहित रवींद्र निकम, विश्वजित प्रज्ञानंद इंगळे आणि विशाल भास्कर झिलमेवार अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक वाघ करीत आहेत.

महिलेला नातेवाईकांची मारहाण
 
औरंगाबाद : धोपटेश्वर येथील महिलेला शेजारी राहणाऱ्या नातेवाईक महिलेने मुलासह मारहाण केली. ही घटना शनिवारी (ता. सात) दुपारी एकच्या सुमारास शेतात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश पुंडलिक चव्हाण (२०) याच्या आईला नातेवाईक महिलेने विनाकारण मारहाण व शिवीगाळ केली. यावेळी महिलेचा मुलगा साहील उत्तम चव्हाण यानेही मारहाण करून येथे कसे राहता ते पाहू अशी धमकी दिली. त्यावरून हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पुन्हा एका बालिकेवर अत्याचार.. वाचा कुठे

हातगाडी चालकांवर कारवाई 

औरंगाबाद : शहागंज परिसरातील गांधी पुतळा भागात रस्त्याच्या मधोमध हातगाडी उभी करून रहदारीला अडथळा करणाऱ्या पाच जणांवर पोलिसांनी शनिवारी (ता. सात) सिटीचौक पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत मिर्झा अहेमद बेग, आसिफ हशम शेख, सुरेश शेटे, शेख मोहम्मद शेख जावेद, शेख जमीर शेख जमील व शाहरुख जमीर पठाण यांच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. त्यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

पोलिस अधीक्षक कार्यालयात ‘भरोसा सेल’चे उद्‍घाटन 

औरंगाबाद : जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ‘भरोसा सेल’ची स्थापना करण्यात आली आहे. या सेलचे उद्‍घाटन अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते रविवारी (ता. आठ) करण्यात आले. महिला अथवा मुलीला तिच्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी; तसेच शारिरिक व मानसिक बळ मिळवून देण्याच्या उद्देशाने या सेलची स्थापना अधीक्षक कार्यालयात करण्यात आली आहे.

कुठं सापडलं जळालेल्या अवस्थेतलं प्रेत...

आधी हेच काम महिला साहाय्य कक्षाच्या माध्यमातून सुरू होते. मोक्षदा पाटील यांनी महिला व बालकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. सेलच्या माध्यमातून संकटात सापडलेल्या महिला व बालकांना पोलिस वैद्यकीय सेवा, मानसोपचारतज्ज्ञ, विधीतज्ज्ञ, संरक्षण अधिकारी, समुपदेशन व पुनर्वसन समस्यांचे तत्काळ निवारण करण्यात येईल.

हाच मुख्य उद्देश भरोसा सेलचा असल्याचेही त्या म्हणाल्या. हा सेल तात्पुरत्या स्वरूपात पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर स्थापन करण्यात आला आहे. हा सेल २४ तास कार्यरत राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime News in Aurangabad District