बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर गुन्हे 

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

याबाबत अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांची यादी जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांना देण्यात आली असून तत्काळ कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. गिते यांनी यावेळी दिली.

औरंगाबाद : अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक शोध मोहीम समितीकडून अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेण्यात आलेला आहे. जिल्ह्यात 206 अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले असून 14 अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी औरंगाबाद तालुक्‍यात 3, पैठण 6, वैजापूर 1, खुलताबाद 1 व गंगापूरमध्ये 3 गुन्हे नोंदविण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत सरपंच, ग्रामसेवक यांना सूचना केल्या आहेत. 

हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार   

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता.सहा) अनाधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले.

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन  

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्यासह गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी (आरोग्य), अन्न व औषध प्रशासन, ग्रामीण पोलीस, इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष  

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांद्वारे जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जिवीतास हानीकारक अशा चुकीच्या उपचार पद्धती केल्या जातात. ते रोखण्यासाठी आशा आरोग्य सेविका, स्थानिक नागरिक, सरपंच, गावातील लोकांमध्ये जनजागृती करावी. वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी एकत्रित प्रयत्नातून याप्रकारच्या अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणा-यांवर थेट धाडी टाकून गुन्हे नोंदवावेत अशा सूचना यावेळी श्री. पालवे यांनी संबंधितांना दिल्या.

हेही वाचा : निकम साहेब.. हे जेवण मीच बनवलेय ना! 

खात्री केल्याशिवाय त्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाची परवानगी देऊ नये. तसेच त्यांचे अर्हता कागदपत्रे पडताळणी करण्यास त्यांना काही अडचणी आल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांची मदत घ्यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या. 
याबाबत अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांची यादी जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांना देण्यात आली असून तत्काळ कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. गिते यांनी यावेळी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crimes on bogus medical professionals