CoronaVirus :औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची बातमी : येते ४८ तास...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

येत्या ४८ तास कुणालाच घराबाहेर पडता येणार नाही. जर कुणी व्यक्ती घराबाहेर निघाली तरच तिला दंडुके देत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. 

औरंगाबाद - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव राज्यासह देशात वाढत आहे. या महामारीची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करीत आहे. त्यासाठी लॉकडाऊनच्या उपाययोजनाही हाती घेण्यात आल्या आहेत; मात्र तरीही बहुतांश नागरिक रस्त्यांवर दिसत आहेत. त्यांच्याकडून फारशी जागरूकता बाळगली जात नाही. त्यामुळे आता प्रेमाने बस झाले, घरातच बसा; अन्यथा कारवाईला सामोरे जा असा सक्त इशारा नागरिकांना देण्यात आला आहे. त्या अंतर्गत येत्या ४८ तास कुणालाच घराबाहेर पडता येणार नाही. जर कुणी व्यक्ती घराबाहेर निघाली तरच तिला दंडुके देत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. 

सूत्रांनी माहिती दिली की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. बहुतांश नागरिक मात्र लॉकडाउनला सहजरीत्या घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गर्दी टाळा अन्यथा कडक पाउले उचलावी लागतील, असा इशारा दिला आहे. दरम्यान, आता पोलिस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांना लॉकडाउन आणखी कडक करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी २४ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळेच आता ४८ तास प्रशासन कुणाचीही गय करणार नाही. एकप्रकारे खूप प्रेमाने झाले, आता घरी बसावेच लागेल हे स्पष्ट आहे. त्यामुळे ता. ३० आणि ३१ मार्च औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची राहणार असून, कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.  

शहरातील पन्नास जणांविरोधात कारवाई 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. असे असतानाही विविध कारणे सांगत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या जवळपास पन्नास नागरिकांच्या विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराच्या बाहेर पडू नये, आवश्यक असल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत गरज असेल तरच बाहेर पडावे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दिवसभर घरांमध्ये बसून कंटाळा आलेले नागरिक विनाकारण रस्त्यावर येत आहेत. त्यासाठी खोटे बहाणे सांगत आहेत.

अशा विनाकारण फिरणाऱ्यांना विचारपूस केल्यानंतर कारण खोटे आहे, असे लक्षात येताच पोलिस चांगलाच प्रसाद देत आहेत. आता मात्र नागरिकांना फटके देण्याबरोबरच त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. शहरातील क्रांती चौक, मुकुंदवाडी, सिडको, उस्मानपुरा, एमआयडीसी वाळूज, वाळूज अशा जवळपास सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शनिवारी (ता.२८) शहरातील विविध पोलिस ठाण्यांत जवळपास ५० विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curfew in Aurangabad