लोडिंग रिक्षातून धोकादायक वाहतूक 

अनिल जमधडे
गुरुवार, 2 जानेवारी 2020

शहर परिसरात पोलिसांच्या साक्षीने सुरू आहे खेळ 
 

औरंगाबाद : शहरात धोकादायक पद्धतीने बांधकाम साहित्य, लोखंडी सळया, अँगल यांची लोडिंग रिक्षांद्वारे वाहतूक करण्यात येत आहे. पोलिसांच्या साक्षीने ही वाहतूक सुरू असून, सामान्यांची अडवणूक करणारे पोलिस अशा धोकादायक वाहनांकडे मात्र दुर्लक्ष करत आहेत. 
शहरामध्ये लोडिंग रिक्षा, लोडिंग ऍपेरिक्षा, मिनी ऍपे अशा वाहनांमधून लोखंडी सळया, लोखंडी अँगल, पाण्याच्या टाक्‍या, ओव्हरलोड साहित्य भरलेल्या ट्रक आणि ट्रॅक्‍टरची बिनधास्त वाहतूक सुरू झालेली आहे. शहरातील जालना रोड, जळगाव रोड, हर्सूल रोड, मुकुंदवाडी, रेल्वेस्थानक रोड अशा विविध रस्त्यांवर धोकादायक वाहने रस्त्यावरून फिरत आहेत. प्रत्येक चौकामध्ये वाहतूक पोलिसांच्या साक्षीने ही वाहतूक सुरू आहे. 

अपघाताची शक्‍यता 

रस्त्यावरून धावणाऱ्या अशा धोकादायक वाहनांमुळे अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. लोडिंग रिक्षामध्ये आठ ते दहा फुटांपर्यंतचे अँगल आणि सळया वाहतूक करताना, रिक्षाच्या समोर दोन ते तीन फूट आणि पाठीमागेही तीन फुटापर्यंत लोंबकाळलेल्या अवस्थेत हा रिक्षा बिनधास्तपणे बेफाम वेगाने धावत असतो. अशा रिक्षातून अँगल निसटला तर पाठीमागे येणाऱ्या दुचाकीस्वाराचा शिरच्छेद झाल्याशिवाय राहणार नाही अशा धोकादायक अवस्थेत ही वाहतूक केली जात आहे. 

हेही वाचा - काय भयानक अनुभव आला या शिक्षिकेला वाचा...

पोलिसांचे होतेय दुर्लक्ष 

शहरात दुचाकीस्वारांना लक्ष करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी लोडिंग वाहनांद्वारे होणाऱ्या या धोकादायक वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अशी वाहने फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही धावताना दिसत आहेत. माल वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाला प्रत्येक वर्षी आरटीओ कार्यालयाकडे तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश लोडिंग रिक्षा, ट्रॅक्‍टर, टाटा 407 अशी वाहने विनाफिटनेस रस्त्यावर धावताना दिसत आहेत. 

क्लिक तर करा - लघुशंकेला आडोशाला जाताय? आधी दारुडा दिसतो का बघा...

आरटीओचीही कारवाई नाहीच 

रस्त्यावर धावणाऱ्या विनाफिटनेस वाहनांवर आरटीओ कार्यालयाने कारवाई करणे आवश्‍यक आहे. प्रवासी वाहतूक करणारे आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रत्येक वर्षी फिटनेस तपासणी करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. अनेक वाहने फिटनेस तपासणी करत नाही, त्यामुळे शासनाचा महसूल तर बुडतोच; मात्र वाहतुकीतही धोके निर्माण होतात, अपघाताची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने सातत्याने अशा धोकादायक वाहनांच्या विरोधात मोहीम राबवणे आवश्‍यक आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून आरटीओ कार्यालयाने शहरात अशा प्रकारच्या वाहनांच्या विरोधात कारवाई केलीच नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous Transport in Aurangabad