
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या सीईओपदाचा वाद गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या सीईओ पदाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने सीईओपदी बाबासाहेब मनोहरे यांची एक फेब्रुवारीला नियुक्ती केली. गुरुवारी (ता. १८) आपण रूजू झाल्याचे पत्र त्यांनी दिले पण कार्यालयात आलेच नाहीत. विशेष म्हणजे या बदलीला पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली असल्याचे सांगितले जात आहे.
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या सीईओपदाचा वाद गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. आत्तापर्यंत सीईओपद हे महापालिकेच्या आयुक्तांकडेच होते पण राज्य शासनाने एक फेब्रुवारीला आदेश काढत सीईओपदी बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. नगर विकास विभागाने परस्पर केलेल्या नियुक्तीचा वाद पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर मांडण्यात आला.
वाचा - जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला पाडणार एकटे, राज्यमंत्री सत्तार यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसही विरोधात
शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे सीईओपदी पांडेय यांनाच कायम ठेवावे अशी मागणी केली. पांडेय यांच्या नेतृत्वाखाली शहरात अनेक प्रकल्प सुरू आहेत. या कामावर सीईओ बदलल्याने परिणाम होऊ शकतो, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असतानाच गुरुवारी बाबासाहेब मनोहरे यांनी पत्र लिहून आपण स्मार्ट सिटीच्या सीईओपदाचा पदभार घेत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. मात्र ते गुरूवारी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात आलेच नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कार्यालयात न येता परस्पर पदभार कसा घेतला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Edited - Ganesh Pitekar